शिराळा पश्चिम भागात २३ ठिकाणी दरडी कोसळल्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2021 04:27 IST2021-07-27T04:27:59+5:302021-07-27T04:27:59+5:30
फोटो ओळ : हत्तेगाव (ता. शिराळा) येथील डोंगरात मुसळधार पावसामुळे भूस्खलन होऊ लागले आहे. लोकमत न्यूज नेटवर्क कोकरूड : ...

शिराळा पश्चिम भागात २३ ठिकाणी दरडी कोसळल्या
फोटो ओळ : हत्तेगाव (ता. शिराळा) येथील डोंगरात मुसळधार पावसामुळे भूस्खलन होऊ लागले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
कोकरूड : शिराळा तालुक्याच्या पश्चिम भागातील अनेक गावे, वाड्या, वस्त्या डोंगराच्या पायथ्याशी आहेत. यंदा मुसळधार पावसामुळे या भागात २३ ठिकाणी दरडी कोसळल्या, भूस्खलन व टेकडींना भेगा पडण्याचे प्रकार घडले आहेत. हे सर्व आगामी काळातील धोक्याची घंटा असून यावर आताच तोडगा काढणे गरजेचे आहे.
रायगड, रत्नागिरी, सातारा जिल्ह्यांतील तळीये, पोसरे बौद्धवाडी, मिरगाव, ढोकावळे, परळी, अहमदाबाद आदी गावांत दरडी कोसळून अनेकांचे बळी गेले आहेत. या घटनेच्या पार्श्वभूमीवर शिराळा पश्चिम भागातील भूस्खलनाच्या घटनांची योग्य दखल घेण्याची गरज आहे.
शिराळा तालुका हा पूर्ण डोंगर, दऱ्यांचा आहे. पश्चिम भागातील मणदूर, जाधववाडी, येसलेवाडी, भाष्टेवाडी, आरळा, भाडुगळेवाडी, वाकाईवाडी, काळामवाडी, किनरेवाडी, चिंचेवडी, ढाणकेवाडी, डफळेवाडी, खराळे, चरण, चरणचीवाडी, कुंभवडेवाडी, पोळवस्ती, मेणी, सावंतवाडी, माळवाडी, शिरसटवाडी, खटिंगवाडी, आटूगडेवाडी (मेणी), गवळेवाडी, कांबळेवाडी, मोरेवाडी, चिंचोली, धसवाडी, कुसाईवाडी, दुरंदेवाडी, पावलेवाडी यासारखी गावे डोंगराला लागून आहेत.
यावर्षी झालेल्या पावसाने कोकरूड येथील गोळोबा डोंगर, गवळेवाडी येथील टवलोबा, आटूगडेवाडी (येळापूर), अंबाबाईवाडी, चव्हाणवाडी, मोहरे, चरण, पणूब्रे, येसलेवाडी, भाष्टेवाडी, कोकणेवाडी, आरळा, गुढे, पाचगणी आदी ठिकाणच्या डोंगरात तब्बल २३ ठिकाणी दरडी कोसळणे, भूस्खलन होणे, भेगा पडणे अशा घटना घडल्या आहेत. हा आगामी काळात धोक्याचा इशारा असून माळीण, तळीये, आंबेघर यासारख्या घटना टाळायच्या असतील, तर प्रशासनाने वेळीच याची दखल घेणे गरजेचे आहे.