मिरज पूर्वमध्ये विहिरींनी तळ गाठला
By Admin | Updated: April 20, 2015 00:10 IST2015-04-19T22:23:48+5:302015-04-20T00:10:35+5:30
नळ पाणी पुरवठ्यावर परिणाम : तलाव, पाणीसाठे भरून देण्याची मागणी

मिरज पूर्वमध्ये विहिरींनी तळ गाठला
प्रवीण जगताप - लिंगनूर मिरज पूर्व भागातील बेळंकी, लिंगनूर, खटाव या गावांतील नळांना पाणीपुरवठा करणाऱ्या विहिरींच्या पाणी पातळीत कमालीची घट झाली आहे. खालावलेल्या पाणी पातळीमुळे नियमित नळाचे पाणी मिळण्यास ‘ब्रेक’ बसू लागला आहे. बेळंकी येथील दोन्ही पिण्याच्या पाण्याच्या विहिरींची पाणी पातळी घटली आहे. महिन्याभरापासून विस्कळीत व अपुऱ्या पाणीपुरवठ्याच्या समस्येमुळे भागातील महिला व सामान्य जनतेचे पिण्याच्या पाण्यासाठी हाल सुरू झाले आहेत. येथे चार-पाच दिवसांनंतर पाणी मिळत आहे, तर लिंगनूरचा मुख्य तलाव आटल्याने त्याखालील नळ पाणीपुरवठ्याच्या लिंगनूर व खटावच्या विहिरींचीही पाणी पातळी घटली आहे. सध्या या विहिरीत असणारे पाणी गाळाचे आहे व ते पिण्यायोग्य नाही. यंदा प्रथमच लिंगनूरमध्ये आठवड्यात दोन दिवस व पुन्हा रविवारी पाणी पुरवठा अपुरा झाला आहे.
तसेच लिंगनूर येथील यल्लम्मा मंदिर परिसरातील विहिरींचे पाणीही संपले आहे. दोन्ही विहिरींनी तळ गाठल्यामुळे कधी नव्हे ते पहिल्यांदाच येथील नळाद्वारे केला जाणारा पाणी पुरवठा अडचणीत आला आहे. विहिरीतील अपुऱ्या पाणीसाठ्यामुळे गावातील नळांनाही अपुरा पाणीपुरवठा होऊ लागला आहे. आठवड्यापासून कालव्या-उपकालव्यांतून म्हैसाळचे पाणी वाहू लागले आहे. वीज पडून म्हैसाळच्या युनिटमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने तीन दिवस योजना दुरूस्तीच्या कामात बंद झाली होती. मात्र आज पुन्हा योजना कार्यान्वित झाली आहे. या पाण्याचा अप्रत्यक्षरित्या लिंगनूर, बेळंकी येथील नळ पाणीपुरवठा करणाऱ्या विहिरींची पाणी पातळी वाढविण्यासाठी कितपत फायदा होतो, याकडेही जनतेचे लक्ष आहे.
लिंगनूर मुख्य तलावात ‘म्हैसाळ’चे पाणी कधी? अशात लिंगनूर येथील मुख्य तलावावर कार्यरत असणाऱ्या काडदेव पाणी वापर संस्थेने काही प्रमाणात पाणीपट्टी जमा करून म्हैसाळ योजनेच्या पाण्याने तलाव भरून घेतल्यास आपोआपच त्याखाली असणाऱ्या व लिंगनूर गावाला नळ पाणीपुरवठा करणाऱ्या विहिरीची पाणी पातळी आपोआप वाढणार आहे.
खालावलेल्या पाणी पातळीचा खटाव गावाच्या विहिरीसही फटका बसला आहे. त्यामुळे या तलावात म्हैसाळचे पाणी कधी दाखल होणार, याकडे परिसराचे लक्ष आहे.
मोटारी जोडणाऱ्यांचा फटका सामान्यांना
एकीकडे पाणीटंचाईचा प्रश्न उभा ठाकला असताना नळाचे पाणी सोडल्यानंतर काही ग्राहकांकडून विद्युत मोटारी जोडून पाणी खेचले जात असल्याने सामान्य ग्राहकांना त्याचा फटका बसत आहे. अपुरा व कमी दाबाने पाणीपुरवठा, त्यात मोटारी लावून पाणी घेतल्याने इतर नागरिकांना पूर्ण क्षमतेने पाणी मिळेनासे झाले आहे. याचा विचार करून एक तर मुबलक पाणी पुरवठा झाला पाहिजे अथवा पाण्याचा साठा कमी असेल, टाकीत पाणीसाठा कमी असेल, तर किमान नळाला पाणी सोडण्याअगोदर विद्युत मंडळाशी संपर्क करून त्या अर्ध्या तासापुरता गावातील विद्युतपुरवठा सकाळी बंद केला पाहिजे. यामुळे जर ग्राहक विद्युत मोटार जोडून पाणी उपसत असल्यास त्याला आपोआप आळा बसेल व सर्वांना समान क्षमतेने पाणी मिळेल, अशी मागणी सर्वसामान्य लोकांतून होत आहे.
म्हैसाळ योजनेचे पाणी सोनुरे तलाव परिसरातून पुढे यल्लम्मा मंदिरापर्यंत पोहोचल्यास येथील विहिरीचे पाणी वाढणार आहे. त्यामुळे ही विहीर भरल्यानंतर लिंगनूरचा पाणी पुरवठा सुरळीत होईल. दोन्ही विहिरीत पाणीच नसल्याने आठवड्यातून तीन दिवस अपुरा पाणीपुरवठा झाला आहे. परंतु म्हैसाळ योजनेचे पाणी सोनुरे तलाव परिसरात आज पोहोचले आहे. उद्याअखेर ते यल्लम्मा मंदिर परिसरात पोहोचेल, त्यानंतर पाणी पुरवठा सुरळीत करता येईल
- मारूती पाटील, उपसरपंच, लिंगनूर