अपूर्व उत्साहात गणरायाचे स्वागत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2021 04:26 IST2021-09-11T04:26:38+5:302021-09-11T04:26:38+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क सांगली : कोरोना आणि लॉकडाऊनमुळे दाटलेले मळभ दूर करत सांगलीकरांनी गणरायाचे जल्लोषात स्वागत केले. मूर्ती नेण्यासाठी ...

अपूर्व उत्साहात गणरायाचे स्वागत
लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : कोरोना आणि लॉकडाऊनमुळे दाटलेले मळभ दूर करत सांगलीकरांनी गणरायाचे जल्लोषात स्वागत केले. मूर्ती नेण्यासाठी आणि उत्सवाच्या साहित्याच्या खरेदीसाठी शहरातील प्रमुख रस्त्यांवर तोबा गर्दी झाली होती. सार्वजनिक उत्सवासाठी मंडळांचे गणपती नेण्यासाठी संध्याकाळपर्यंत कार्यकर्त्यांची लगबग सुरू होती. ४६७ मंडळांनी श्रींची प्रतिष्ठापना केली.
यंदा कोरोनामुळे उत्सवात मिरवणुकांना प्रतिबंध असला तरी, गणेशभक्तांचा उत्साह मात्र कमी झाला नव्हता. जिल्हा बँकेसमोर आणि मारुती रस्त्यावर मूर्तींच्या स्टॉलवर सकाळपासून गर्दी होती. मुहूर्तावर गणेशाच्या प्रतिष्ठापनेसाठी भाविकांची लगबग होती. सजावटीचे साहित्य, फळे, दुर्वा यांची खरेदीही सुरू होती. गौरीचे मुखवटेदेखील उपलब्ध होते. काही विक्रेत्यांनी घरगुती गणेशोत्सवाच्या मूर्ती सजावटीसह विक्रीसाठी ठेवल्या होत्या. गणरायाला घरी आणण्यासाठी अनेक भाविक संपूर्ण कुटुंबासह आले होते. महिलादेखील बाप्पाला नेण्यासाठी मोठ्या संख्येने आल्या होत्या. लाडक्या बाप्पाला चमकी लावून, रंगरंगोटी करून सजवत होत्या. मंगलमूर्ती मोरयाच्या जयघोषात घरोघरी श्रींचे आगमन झाले.
मिरवणुकीला प्रतिबंध असला, तरी अनेक कुटुंबांनी वाजतगाजत बाप्पाला घरी नेले. मोठ्या मंडळांनी ट्रॅक्टर, छोटे टेम्पो व रिक्षातून मूर्ती नेल्या. बँड आणि डॉल्बी नसला, तरी कार्यकर्त्यांचा जल्लोष मात्र कोठेच कमी पडला नाही. मंडळांनी खासगी जागेत, गाळ्यांत श्रींची प्रतिष्ठापना केली. संध्याकाळी उशिरापर्यंत मंडळांच्या मूर्ती नेल्या जात होत्या.
चौकट
शहरात ४६७ मंडळांचा उत्सव
शहरभरात ४६७ मंडळे गणेशोत्सव साजरा करत आहेत. शहर पोलीस ठाण्याच्या कार्यकक्षेत २३९, विश्रामबागच्या कार्यकक्षेत १४०, तर संजयनगरच्या कक्षेत ८८ मंडळांनी श्रींची प्रतिष्ठापना केली आहे. रस्त्यावर मंडप घालणाऱ्या काही मंडळांना पोलिसांनी प्रतिबंध केला. मनाई आदेशामुळे कार्यकर्त्यांचा धिंगाणा मात्र कोठेच दिसला नाही.
चौकट
लॉकडाऊनमध्ये प्रथमच मोठी उलाढाल
गणेशोत्सवाच्या निमित्ताने बाजारपेठेत मोठ्या प्रमाणात आर्थिक उलाढाल झाली. गेली दीड वर्षे बाजारपेठेत उत्साह नव्हता; पण गणेशोत्सवाने चैतन्य निर्माण केले.