फोटो-
इस्लामपूर येथील गांधी चौक परिसरात श्री गणेशाचे भाविकांनी उत्साही वातावरणात स्वागत केले.
लोकमत न्यूज नेटवर्क
इस्लामपूर : इस्लामपूर शहरात विघ्नहर्त्या श्री गणरायाचे उत्साहात स्वागत करण्यात आले. सकाळपासून घरगुती बाप्पांना अबाल-वृद्धांनी ‘गणपती बाप्पा मोरयाऽऽ’चा जयघोष करीत घरी आणले. घरोघरी ‘श्रीं’ची मनोभावे प्रतिष्ठापना करून आरती केली जात होती.
यावेळी सलग दुसऱ्यावर्षी कोरोनाच्या संसर्गामुळे सार्वजनिक गणपती प्रतिष्ठापनेला पोलिसांनी परवानगी दिलेली नाही. त्यामुळे आता खासगी जागेत मूर्तीं बसविण्यात आल्या आहेत. शहरामध्ये जवळपास ५० हून अधिक सार्वजनिक मंडळे आहेत. मात्र यावर्षी पहिल्यांदाच शहरवासीयांना सार्वजनिक गणेशोत्सवाचे दर्शन मिळणार नाही.
श्री गणेशाच्या आगमनाच्या पार्श्वभूमीवर येथील गांधी चौकात गणेशमूर्ती, आरास, सजावट आणि प्रसादाचे स्टॉल लागल्याने या परिसरात गर्दी होती. येथूनच अनेक घरा-घरात बाप्पांनी प्रस्थान केले. दिवसभर गणपतीच्या जयघोषाने परिसरात नवचैतन्य पसरले होते.