मिरजेत गणेशोत्सवातील स्वागत कमानी यंदाही रद्द
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 4, 2021 04:31 IST2021-09-04T04:31:34+5:302021-09-04T04:31:34+5:30
कोरोनामुळे सलग दुसऱ्या वर्षी सण उत्सव साजरे करण्यास प्रशासनाने निर्बंध घातले आहेत. या वर्षीही गणेशोत्सवावरही कोरोनाचे सावट असल्याने, मिरजेत ...

मिरजेत गणेशोत्सवातील स्वागत कमानी यंदाही रद्द
कोरोनामुळे सलग दुसऱ्या वर्षी सण उत्सव साजरे करण्यास प्रशासनाने निर्बंध घातले आहेत. या वर्षीही गणेशोत्सवावरही कोरोनाचे सावट असल्याने, मिरजेत गणेशोत्सवात विसर्जन मिरवणूक मार्गावर उभारण्यात येणाऱ्या स्वागत कमानींना प्रतिबंध करण्यात आला आहे. दोन वर्षांपूर्वी महापुरामुळे सर्व पक्ष संघटनांनी स्वागत कमानी रद्द केल्या होत्या. त्यानंतर, कोरोना साथीमुळे गतवर्षी व आता दुसऱ्या वर्षी या स्वागत कमानींवर निर्बंध घालण्यात आले आहेत. यामुळे सलग तीन वर्षे मिरवणूक मार्गावर विविध पक्ष संघटनांच्या स्वागत कमानी दिसणार नाहीत.
मिरवणूक मार्गावरील भव्य स्वागत कमानी मिरजेतील गणेशोत्सवाचे वैशिष्ट असून, या स्वागत कमानींना गेली चाळीस वर्षांची परंपरा आहे. शिवसेना, हिंदू एकता, मराठा महासंघ, मनसे विश्वशांती संघटना यासह विविध मंडळांतर्फे मिरवणूक मार्गावर लाखो रुपये खर्चून सुमारे १५ स्वागत कमानी उभारण्यात येतात. स्वागत कमान व स्वागत कक्षातून विसर्जन मिरवणुकीचे स्वागत करण्यात येते. महापूर व कोरोनामुळे सलग तीन वर्षे मिरजेतील ही परंपरा खंडित झाली आहे.