कोरोनावर मात केलेल्या ४५०० लोकांच्या वजन वाढल्याच्या तक्रारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 07:31 IST2021-02-05T07:31:24+5:302021-02-05T07:31:24+5:30
सांगली : जिल्ह्यातील कोरोनामुक्त झालेल्यांपैकी १० टक्के लोकांमध्ये म्हणजेच सुमारे ४ हजार ५०० लोकांमध्ये वजन वाढल्याच्या तक्रारी आहेत. कोरोना ...

कोरोनावर मात केलेल्या ४५०० लोकांच्या वजन वाढल्याच्या तक्रारी
सांगली : जिल्ह्यातील कोरोनामुक्त झालेल्यांपैकी १० टक्के लोकांमध्ये म्हणजेच सुमारे ४ हजार ५०० लोकांमध्ये वजन वाढल्याच्या तक्रारी आहेत. कोरोना काळातील स्टेरॉईडचा डोस, खाण्यातील बदल, शारीरिक हालचालींचा अभाव यामुळे वजन वाढल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे कोरोनामुक्त झालेल्या लोकांना आता वजन घटविण्याबरोबर शारीरिक सक्षमतेबाबत सतर्कता बाळगावी लागणार आहे.
जिल्ह्यातील कोरोनामुक्त झालेले रुग्ण, कोविडची खासगी रुग्णालयांमधील डॉक्टर यांच्याशी केलेल्या चर्चेनंतर कोरोनामुक्त झालेल्या लोकांमध्ये वजन वाढल्याची बाब समोर आली. याचे प्रमाण १० ते १२ टक्के इतके आहे. वजन वाढण्याची वेगवेगळी कारणे असली तरी कोरोनामुक्तीनंतर वजन घटविण्याबरोबर शारीरिक सक्षमता वाढविण्याकडे कोरोनामुक्त लोकांनी भर दिल्याचे दिसत आहे. शासकीय व खासगी रुग्णालयातील डॉक्टरांकडूनही त्याबाबत सल्ले दिले जात आहेत. वजन वाढण्याकडे दुर्लक्ष केल्यास आणखी काही आजारांना निमंत्रण मिळू शकते. त्यामुळे अशा लोकांना व्यायाम व आहाराबाबत सूचना दिली जात आहे.
चौकट
जिल्ह्यातील एकूण रुग्ण ४८,०१७
कोरोनामुक्त झालेले ४६,१२८
वजन वाढीच्या तक्रारी असलेले ४,५००
चौकट
स्टेरॉईडसह अन्य कारणांमुळे वाढते वजन
कोरोनाग्रस्तांपैकी अनेकांना स्टेरॉईडचे डोस द्यावे लागतात. त्यामुळे काही प्रमाणात वजन वाढू शकते. त्याचबरोबर विश्रांतीचा काळ अधिक असणे, जेवणातील बदल आदी कारणांमुळेही वजन वाढू शकते. काही खासगी कोविड सेंटरचालक डॉक्टरांनी सांगितले की, सुमारे १० ते १२ टक्के कोरोनामुक्त लोकांमध्ये वजन वाढीची लक्षणे दिसून आली. स्टेरॉईडसह आजारातून बरे झाल्यानंतर सतत विश्रांती, भूक जास्त लागल्यामुळे जेवण जास्त करणे, शारीरिक हालचाली कमी होणे यामुळे वजन वाढते. काहींमध्ये शुगर व रक्तदाबाच्याही तक्रारीही निर्माण झाल्याचे काही खासगी डॉक्टरांनी सांगितले.
चौकट
कोरोनातून बरे झाल्यावर सात किलो वजन वाढले
सांगलीतील योगेश राजहंस यांनी सांगितले की, दाखल झालो तेव्हा पाच किलो वजन कमी झाले होते. कोरोनातून बरा झाल्यानंतर काही दिवसांतच सात किलो वजन वाढले. या काळात भूक फार लागत होती. जेवण वाढले, व्यायामाचा अभाव, विश्रांती यामुळे वजन वाढले. स्टेरॉईडचा डोस दिल्यानेही हा फरक पडतो. शिवप्रसाद पाटील यांनी सांगितले की, कोरोनाच्या काळात शारीरिक बदल होत असल्याचे जाणवले. केसगळती झाली. दाखल झाल्यानंतर वजन खुप कमी झाले होते. बरे झाल्यानंतर काही दिवसांनी वजनात वाढ झाली.
कोट
स्टेरॉईडमुळे काहीप्रमाणात वजन वाढू शकते, मात्र अन्य कोणत्या कारणांनी वजन वाढण्याचे कारण नाही. कोरोनानंतरच्या काळात वजन वाढलेल्या लोकांनी संतुलित आहार, पुरेशी झोप व नियमित व्यायामा या गाेष्टींवर लक्ष द्यावे. अनावश्यक वजन वाढणार नाही, याची दक्षता घ्यावी. वेळावेळी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
-डॉ. संजय साळुंखे, जिल्हा शल्यचिकित्सक, सांगली