सांगली : शहरातील उपनगरांमध्ये असणारे १९ आठवडा बाजार तातडीने सुरू करावेत, अशी मागणी करीत जनसेवा भाजीपाला विक्रेता संघटनेच्यावतीने बेमुदत विक्री बंद आंदोलनास मंगळवारी सुरुवात झाली. यास घाऊक भाजीपाला विक्रेत्यांनीही पाठिंबा दिला.
संघटनेचे प्रमुख शंभोराज काटकर यांनी याबाबत दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, जनसेवा फळे, भाजीपाला संघटना गर्दी न करता स्वतःच गार्ड नेमून कोरोना नियमांचे पालन करेल. गर्दी टाळण्याची जबाबदारी घेण्यास आम्ही तयार आहोत. महापालिका आणि जिल्हा प्रशासनाने यासाठी सहकार्य करावे.
शहरातील अनधिकृत ठिकाणी म्हणजेच दत्त मारुती रोडवरील बाजार भरून गर्दी होत असताना त्याकडे महापालिका, पोलीस व जिल्हा प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. १९ भाजीपाला बाजार आठवड्याला भरले तर शहरातील गर्दी पूर्णतः कमी होईल होईल. आदर्श विक्री आणि कोरोनापासून बचावाचे मॉडेल जनसेवा संघटनेकडे तयार आहे. त्याला महापालिका, पोलीस आणि जिल्हा प्रशासनाने प्रतिसाद दिला तर राज्यात आदर्श अशी व्यवस्था उभी करणे शक्य आहे. जोपर्यंत परवानगी मिळणार नाही तोपर्यंत भाजीपाला विक्री बंदच राहणार आहे. आमच्या आंदोलनात ४ हजार भाजीपाला विक्रेत्यांचा सहभाग आहे, असे त्यांनी सांगितले.