जिल्ह्यातील आठवडी बाजार दोन आठवडे बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 24, 2021 04:24 IST2021-03-24T04:24:51+5:302021-03-24T04:24:51+5:30
सांगली : कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी जिल्ह्यातील सर्व आठवडी बाजार दोन आठवड्यांसाठी बंद ठेवण्याचे आदेश पालकमंत्री जयंत पाटील यांनी दिले ...

जिल्ह्यातील आठवडी बाजार दोन आठवडे बंद
सांगली : कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी जिल्ह्यातील सर्व आठवडी बाजार दोन आठवड्यांसाठी बंद ठेवण्याचे आदेश पालकमंत्री जयंत पाटील यांनी दिले आहेत. त्यानंतर स्थितीचा आढावा घेऊन पुढील निर्णय घेण्यात येईल असे ते म्हणाले. गर्दीवर नियंत्रण आणण्यासाठी उपाययोजना राबविण्याचे आदेशही दिले. जिल्हाधिकारी कार्यालयातील बैठकीत ते बोलत होते.
ते म्हणाले, संसर्ग रोखण्यासाठी गर्दीवर नियंत्रण आवश्यक आहे. बाजारांवर निर्बंध आणताना लोकांच्या सोयीचाही विचार करावा. भाजीपाला, जीवनावश्यक वस्तूंची कमतरता भासू नये याचे नियोजन प्रशासनाने करावे. वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन शासकीय रूग्णालयांसह खासगी रूग्णालयांतही उपचारांची तजवीज करावी. पुरेसा औषधसाठा ठेवावा. लोकांनी दुखणी अंगावर न काढता त्वरित औषधोपचार घ्यावेत. प्रादुर्भाव वाढल्यास पुरेसे बेड, ऑक्सिजन, औषधे, व्हेंटिलेटर इत्यादी सुविधा सज्ज ठेवाव्यात. चाचण्यांचे प्रमाणही वाढवावे.
पाटील यांनी लसीकरण मोहिमेचाही आढावा घेतला. जिल्ह्यात पहिला डोस १ लाख ८३२ जणांनी घेतला असून दुसरा डोस घेतलेल्यांची संख्या १५ हजार ७१० आहे.
बैठकीला महापौर दिग्विजय सूर्यवंशी, जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी, पोलीस अधीक्षक दीक्षित गेडाम, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र डुडी, महापालिका आयुक्त नितीन कापडणीस, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. सुधीर नणंदकर, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संजय साळुंखे, निवासी उपजिल्हाधिकारी मौसमी चौगुले-बर्डे, उपजिल्हाधिकारी विवेक आगवणे, जिल्हा आरोग्याधिकारी डॉ. मिलिंद पोरे, सार्वजनिक बांधकामचे कार्यकारी अभियंता संतोष रोकडे, समाज कल्याणचे सहाय्यक आयुक्त अर्जुन बन्ने, नियोजन अधिकारी सरिता यादव, समाजकल्याण अधिकारी संजय पवार आदी उपस्थित होते.
चौकट
आयर्विन पुलावरुन दुचाकीला परवानगी
आयर्विन पुलाच्या दुरुस्तीचे काम सुरू असले तरी दुचाकीसाठी तत्काळ सुरू करण्याचे आदेश पाटील यांनी दिले. सांगलीवाडीसह पश्चिम भागातील लोकांना सांगलीत येण्यासाठी दूरचा प्रवास करावा लागत असल्याच्या तक्रारी आल्याने पाटील यांनी हे आदेश दिले.