म्हैसाळच्या विस्तारित याेजनेसाठी चार महिन्यांमध्ये मंजुरी मिळवू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 23, 2021 04:29 IST2021-08-23T04:29:17+5:302021-08-23T04:29:17+5:30
ओळ : उमदी (ता. जत) येथे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांचा ॲड. चन्नाप्पा हाेर्तीकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. ...

म्हैसाळच्या विस्तारित याेजनेसाठी चार महिन्यांमध्ये मंजुरी मिळवू
ओळ : उमदी (ता. जत) येथे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांचा ॲड. चन्नाप्पा हाेर्तीकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी म्हळाप्पा पुजारी, सुरेशराव शिंदे उपस्थित हाेते.
लाेकमत न्यूज नेटवर्क
उमदी : वारणा प्रकल्पातून जत तालुक्यातील वंचित ६५ गावांना सहा टीएमसी पाणी देण्यासंदर्भात निर्णय घेतला आहे. या योजनेसाठी चार महिन्यांत मंजुरी मिळवून अडीच वर्षांत काम पूर्ण करू, अशी ग्वाही पालकमंत्री तथा जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी रविवारी दिली.
वारणेतून सहा टीएमसी जादा पाणी जत तालुक्यास देण्याबाबत निर्णय झाल्यानंतर प्रथमच जयंत पाटील जत तालुक्याच्या दौऱ्यावर आले होते. यानिमित्त ६५ गावांच्या वतीने उमदी (ता. जत) येथे पाटील यांचा नागरी सत्कार करण्यात आला.
जयंत पाटील म्हणाले, जत तालुक्यातील उर्वरित गावांना पाणी देण्यासाठी बराच अभ्यास करावा लागला. लवादाप्रमाणे म्हैसाळ योजनेतून सध्याच्या योजनेनुसार तेवढेच पाणी देता येत होते. वारणा प्रकल्पातून पाण्याची मागणी कमी होती; त्यामुळे या योजनेतून जत तालुक्याला पाणी देण्याचे ठरले. अधिकाराचा वापर करून तसे पत्र कृष्णा खोरेला दिले आहे. राजारामबापूंनी उमदीला पाणी मिळण्यासाठी उमदी ते सांगली पदयात्रा काढली होती. ते स्वप्न पूर्ण होण्यासाठी ही योजना हाती घेतली आहे. याची पहिली पायरी पूर्ण झाली आहे. डिझाईन करायला घेतले आहे. तिसऱ्या टप्प्यातून पाणी उचलले जाणार आहे. ३६ किलाेमीटर उताराने पाणी येऊन दोन जागी उचलले जाईल. त्यानंतर जत तालुक्यातही मिरवाड व मल्लाळ येथे पाणी उचलावे लागेल. त्यानंतर उताराने उर्वरित ६५ गावांना पाणी देता येणार आहे. यामुळे संपूर्ण जत तालुका सिंचनाखाली येणार आहे.
ॲड. चन्नाप्पा होर्तीकर म्हणाले, जत तालुक्याला पाण्यासंदर्भात जेवणाच्या शेवटच्या पंगतीला तरी जेवण मिळाले, हे आम्ही भाग्य समजतो. नवीन विस्तारित योजनेला राजारामबापू पाटील यांचे नाव द्यावे.
याप्रसंगी एम. के. उर्फ म्हळाप्पा पुजारी, सुरेशराव शिंदे, उत्तम चव्हाण, रमेश पाटील यांची भाषणे झाली.
220821\img-20210822-wa0021.jpg
मंत्री जयंत पाटील यांचा६५ गावांच्यावतीने सत्कार करण्यात आला.