‘सनातन’च्या वकिलाची चौकशी करावी
By Admin | Updated: June 13, 2016 00:37 IST2016-06-13T00:37:29+5:302016-06-13T00:37:51+5:30
मुक्ता दाभोलकर : सारंग अकोलकर संपर्कात, तर तपास यंत्रणा गप्प का?

‘सनातन’च्या वकिलाची चौकशी करावी
सांगली : मडगाव बॉम्बस्फोटातील फरार सारंग अकोलकर हा डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येप्रकरणी अटकेत असलेल्या वीरेंद्र तावडे याच्या संपर्कात असल्याचे पुरावे सीबीआयला मिळाले आहेत. ‘सनातन’चे वकील संजीव पुनाळेकर हेही ‘अकोलकर हा माझ्या संपर्कात आहे’, असे जाहीरपणे सांगत असतील, तर तपास यंत्रणा का गप्प आहे? असा सवाल अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या मुक्ता दाभोलकर यांनी केला. याप्रकरणी अॅड. पुनाळेकर यांची चौकशी करावी, अशी मागणीही त्यांनी केली.
मुक्ता दाभोलकर रविवारी सांगलीत आल्या होत्या. त्यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी प्रा. प. रा. आर्डे, राहुल थोरात उपस्थित होते. दाभोलकर म्हणाल्या, नरेंद्र दाभोलकरांची पुण्यात हत्या करण्यात आली. या घटनेला तीन वर्षांचा कालावधी पूर्ण होत आल्यानंतर सीबीआयने हिंदू जनजागृती समितीच्या वीरेंद्र तावडेला अटक केली आहे. उशिरा का होईना, सीबीआय योग्य दिशेने तपास
करीत आहे. पण त्यांनी केवळ एका अटकेवर न थांबता दाभोलकरांचे मारेकरी व त्यामागचा सूत्रधार
तातडीने शोधून काढावा.
खुनाचा तपास ९ मे २०१४ रोजी सीबीआयकडे सोपविला. तपासाला वेग मिळावा, यासाठी दाभोलकर कुटुंबाने मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. गोविंद पानसरे कुटुंबानेही अशी याचिका दाखल केली. त्यामुळे न्यायालयाने या
दोन्ही याचिकांवर एकत्रित सुनावणी केली. न्यायालयाने तपासाच्या संथ गतीवर कडक शब्दात ताशेरे ओढले होते. या पार्श्वभूमीवर सीबीसायने तावडेला केलेली अटक ही तपासाच्यादृष्टीने उचललेले महत्त्वाचे पाऊल आहे.
दाभोलकरांच्या हत्येचा तपास करणारी सीबीआय व पानसरे यांच्या खुनाचा तपास करणारे महाराष्ट्र पोलिस या दोन्ही यंत्रणांनी सनातन संस्था व हिंदू जनजागृती समितीच्या साधकांकडे संशयित म्हणून बोट दाखविले आहे. गोव्यातील मडगाव बॉम्बस्फोटातील फरारी चार संशयितांपैकी रुद्र पाटील व सारंग अकोलकर यांचा शोध घेण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. शासनाने सनातन संस्थेवर बंदी घालण्याचा प्रस्ताव केंद्र शासनाकडे पाठविला आहे. दाभोलकर व पानसरे यांच्या खुनाच्या तपासात आलेल्या पुराव्याच्या आधारावर संस्थेवर तातडीने बंदी घालावी. दाभोलकरांच्या हत्येचा कट कोणी आणि कुठे
रचला? त्यांना कोण मारले?
यामागचा ‘मास्टरमार्इंड’ कोण? ही माहिती जोर्यंत तपासातून पुढे येत नाही, तोपर्यंत अंनिसतर्फे विवेकी मार्गाने पाठपुरावा सुरूच राहील. (प्रतिनिधी)
आंतरराष्ट्रीय पोलिसांची नोटीस
दाभोलकर म्हणाल्या, संशयित सारंग अकोलकर २००९ पासून फरार आहे. आंतरराष्ट्रीय पोलिसांनी त्याच्या कुटुंबास नोटीसही दिली आहे. तरीही तो
सापडत नाही. असे असताना सनातनचे वकील संजीव पुनाळेकर हे ‘फरार अकोलकर माझ्या संपर्कात आहे,’ असे जाहीरपणे सांगत आहेत. तरीही तपास यंत्रणा थंडच आहे.