आम्ही शिराळकर नेक, देशात काढू नंबर एक!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 25, 2021 04:19 IST2021-06-25T04:19:57+5:302021-06-25T04:19:57+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क शिराळा : ‘आम्ही शिराळकर नेक, देशात काढू नंबर एक’ असा नारा शिराळा नगर पंचायतीने दिला असून, ...

आम्ही शिराळकर नेक, देशात काढू नंबर एक!
लोकमत न्यूज नेटवर्क
शिराळा : ‘आम्ही शिराळकर नेक, देशात काढू नंबर एक’ असा नारा शिराळा नगर पंचायतीने दिला असून, यासाठी प्रशिक्षणात मिळालेल्या सूचनांचे पालन करून नागरिकांशी अदबीने वागत त्यांना कचरा वर्गीकृत करून देऊन सहकार्य करण्यास सांगावे, असे आवाहन नगराध्यक्ष सुनीता निकम यांनी केले.
शिराळा नगर पंचायत कार्यालयाकडून ‘माझी वसुंधरा अभियान’ व ‘स्वच्छ सर्वेक्षण २०२२’ची प्रभावी अंमलबजावणी करण्याच्या संकल्पाने सफाई कर्मचाऱ्यांसाठी घनकचरा व्यवस्थापन प्रशिक्षण कार्यक्रम झाला. त्यावेळी निकम बोलत होत्या. यावेळी मुख्याधिकारी योगेश पाटील उपस्थित होते.
यावेळी सेंटर फॉर अप्लाईड रिसर्च अँड पिपल्स एंगेजमेंट या संस्थेकडून कर्मचाऱ्यांना वैयक्तिक स्वच्छता तसेच सुरक्षा साधनांच्या वापराचे महत्त्व पटवून देऊन काम करताना घ्यायच्या काळजीबाबत मार्गदर्शन करण्यात आले. विविध व्हिडीओ क्लिप तसेच गमतीचे खेळ आयोजित करून करमणुकीच्या माध्यमातून जागृत करण्यात आले.
मुख्याधिकारी पाटील यांनी प्रत्येक महिन्यात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या कर्मचाऱ्याला एक हजार रुपयांचे बक्षीस देऊन गौरविण्याचे जाहीर केले. नगर पंचायतीच्या स्वच्छतादुतांनीही ‘आम्ही शिराळकर नेक, देशात काढू नंबर एक’ म्हणत शहर स्वच्छतेचे व्रत स्वीकारले. शहर समन्वयक राहुल निकम, विजय सपकाळ यांनी कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन केले. यावेळी कार्यालयीन अधीक्षक सुविधा पाटील, नयना कुंभार, अर्चना गायकवाड, लक्ष्मण मलमे आदी उपस्थित होते.