आम्हाला पर्यावरणपूरक गणेशमूर्तीच पाहिजेत!

By Admin | Updated: August 7, 2014 00:20 IST2014-08-06T23:28:40+5:302014-08-07T00:20:31+5:30

पर्यावरणप्रेमी भक्तांची मागणी : तीन वर्षांपासून सांगलीत राबविले जाताहेत उपक्रम; वेगवेगळ्या मूर्तींची निर्मिती

We need eco-friendly Ganesh idols! | आम्हाला पर्यावरणपूरक गणेशमूर्तीच पाहिजेत!

आम्हाला पर्यावरणपूरक गणेशमूर्तीच पाहिजेत!

सांगली : मागील तीन वर्षापासून सांगलीत पर्यावरणपूरक अर्थात कागदाचा लगदा, खाण्याचा डिंक आणि कॅल्शिअम कार्बोनेट यांच्या मिश्रणातून गणेशमूर्ती तयार केल्या जात आहेत. विशेष म्हणजे, प्लॅस्टर आॅफ पॅरिसच्या काळातही पर्यावरणपूरक गणेशमूर्तींना दिवसेंदिवस मागणी वाढत चालली आहे. आतापासूनच सूज्ञ सांगलीकरांनी पर्यावरणाला हानिकारक गणेशमूर्ती नाकारून ‘आम्ही, पर्यावरणपूरक गणेशमूर्तीचीच प्रतिष्ठापना करणार’ अशी आशादायक भूमिका घेतली आहे.
शहरातील लुल्ला चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून आभाळमाया फौंडेशन, अवनी फौंडेशन आणि रेड स्वस्तिक सोसायटी या सामाजिक संस्थांनी पर्यावरणपूरक गणेशमूर्ती निर्माण करण्यास प्रारंभ केला. शहरवासियांना पर्यावरणपूरक गणेशमूर्तींचे महत्त्व पटवून सांगितले आणि गणेशभक्तांनीही त्याला सकारात्मक प्रतिसाद दिला. प्लॅस्टर आॅफ पॅरिस पाण्यात विरघळत नाही. परिणामी गणेशमूर्तींचे ज्यावेळी विसर्जन होते, त्यावेळी या मूर्ती नदीपात्राच्या तळाशी जाऊन बसतात आणि पाण्याची पातळी वाढते. कालांतराने नदीकाठच्या नागरिकांनाच वाढीव पाण्याचा धोका संभवतो. पर्यावरणाची हानी होते ती वेगळीच. पर्यावरणपूरक गणेशमूर्ती मात्र पाण्यात विरघळतात. सध्या शहरात ९ इंच आणि १२ इंच अशा दोन आकारात आणि दगडूशेठ हलवाई गणेशाच्या रूपात गणेशमूर्ती उपलब्ध आहेत. ही गणेशमूर्ती दिवसातून एकच तयार होते. साधारणत: जानेवारीपासून पर्यावरणपूरक गणेशमूर्ती बनविण्यास सुरुवात होते. प्रामुख्याने सांगलीवाडीतील काही मूर्तिकार या गणेशमूर्तींची निर्मिती करतात.
पर्यावरणाची हानी रोखायची असेल, तर त्याची सुरुवात आपल्यापासूनच केली पाहिजे. त्यासाठी पर्यावरणपूरक गणेशमूर्तीच्या प्रतिष्ठापनेशिवाय दुसरा कोणता मार्ग आहे, असा विचार गणेशभक्त बोलून दाखवित आहेत. सामाजिक संस्थांनी केलेल्या जनजागृतीमुळेच गणेशभक्तांच्या मानसिकतेत बदल झाला आहे.
गणेशोत्सव आता काही दिवसांवर येऊन ठेपला असल्यामुळे पर्यावरणपूरक गणेशमूर्तींचे आगाऊ बुकिंग सुरू झाले आहे. पर्यावरणपूरक गणेशमूर्तींना वाढती मागणी असली तरी, ती पूर्ण करण्याकरिता मूर्तिकार कमी पडत आहेत. हे चित्र पुढील गणेशोत्सवात बदलण्याचा निर्धार सामाजिक संस्थांनी केलेला आहे. (प्रतिनिधी)

Web Title: We need eco-friendly Ganesh idols!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.