आमचेही कुठे तरी चुकलेच !
By Admin | Updated: May 28, 2014 00:43 IST2014-05-28T00:42:49+5:302014-05-28T00:43:07+5:30
जयंत पाटील : जनतेचा कौल मान्य; कारभारात सुधारणा करू

आमचेही कुठे तरी चुकलेच !
सांगली : लोकसभा निवडणुकीत झालेल्या पराभवामागे अनेक कारणे आहेत. जनतेचा हा कौल आम्ही नम्रपणे स्वीकारला आहे. आमच्याही काही चुका झाल्या असतील. अशा चुकांची दुरुस्ती करून आगामी विधानसभा निवडणुकीला सामोरे जाऊ, असे मत ग्रामविकासमंत्री जयंत पाटील यांनी आज, मंगळवारी येथे पत्रकार परिषदेत व्यक्त केले. ते म्हणाले की, लोकांमधून आलेल्या भावनांचे विश्लेषण आम्ही करीत आहोत. गॅस सिलिंडरची दरवाढ, केवायसीच्या माध्यमातून मतदारांचे झालेले हाल, अन्नसुरक्षा व जीवनदायी योजनेतील काही त्रुटी अशा कारणांनी मतदारांमध्ये शासनाबद्दल नाराजी दिसून आली. याशिवाय मोदींनी केलेला सोशल मीडियाचा प्रभावी वापरही लोकांच्या मतपरिवर्तनास कारणीभूत ठरला. जनता अधिक डोळस झाली आहे. त्यामुळे आम्ही त्यांचा हा कौल मान्य करीत आहोत. स्थानिक पातळीवर आमच्या ज्या काही चुका झाल्या असतील, त्यांतही सुधारणा करण्यात येतील. यंदाच्या लोकसभा निवडणुकीत आघाडी धर्म दोन्ही काँग्रेसच्या नेत्यांनी पाळला. काही लोकांचा अपवाद वगळता सर्वच ठिकाणी नेते एकत्र होते. त्यामुळे आघाडी धर्माविषयी कोणाच्याही मनात शंका नाही. मराठा आरक्षणाबाबत कायदेशीर बाबींची पूर्तता होणे आवश्यक होते. त्यामुळेच निर्णयाला वेळ लागला. मंत्रिमंडळात आमच्यात आरक्षणावरून कोणतेही मतभेद नाहीत. शासन लवकरच याबाबत निर्णय घेईल. एलबीटीबाबतचा निर्णय नगरविकास खात्याच्या अखत्यारीत असल्याने मुख्यमंत्रीच याबाबत निर्णय घेतील. तरीही राष्टÑवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी याबाबत व्यापार्यांशी चर्चा करून आमच्या पक्षाची भूमिका मांडली आहे. आम्ही त्यासाठी पाठपुरावा करू. विविध योजनांच्या अंमलबजावणीच्या त्रुटी दूर करण्याबाबतही शासनस्तरावर पावले उचलली जातील. आगामी विधानसभा निवडणुकीला सामोरे जाताना सोशल मीडियाच्या वापराबाबत पक्षामार्फत प्रयत्न होतील. मोठ्या प्रमाणावर पैसा खर्च करणे शक्य नसल्याने झेपेल तेवढ्या प्रमाणात आम्ही याचा वापर करून लोकांपर्यंत आमच्या योजना व कार्य पोहोचवू, असे त्यांनी सांगितले. मला विश्वजितचा मुद्दा पटतो आगामी विधानसभा निवडणुका एकत्रितपणे लढण्याबाबत काँग्रेसचे विश्वजित कदम यांनी उपस्थित केलेला मुद्दा योग्य वाटतो. धर्मनिरपेक्ष मतांची विभागणी टाळण्यासाठी विधानसभेत आघाडीच असायला हवी. लोकसभा निवडणुकीचा परिणाम विधानसभेवर होईल का, याचा विचार करण्यापेक्षा, लोकांचे प्रश्न सोडवून त्यांचा विश्वास जिंकणे महत्त्वाचे वाटते. असे झाले तर निश्चितपणे आम्हाला जनता कौल देईल, असे जयंत पाटील यांनी स्पष्ट केले.