सांगली प्रदूषणमुक्त उत्सवाच्या वाटेवर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2019 23:45 IST2019-09-07T23:45:33+5:302019-09-07T23:45:38+5:30
सांगली : कृष्णा नदीवर, पर्यावरणावर प्रेम करणाऱ्या सांगलीकरांनी पर्यावरणपूरक, प्रदूषणमुक्त उत्सवाचा कृतिशील मार्ग अवलंबत आदर्श निर्माण केला आहे. विविध ...

सांगली प्रदूषणमुक्त उत्सवाच्या वाटेवर
सांगली : कृष्णा नदीवर, पर्यावरणावर प्रेम करणाऱ्या सांगलीकरांनी पर्यावरणपूरक, प्रदूषणमुक्त उत्सवाचा कृतिशील मार्ग अवलंबत आदर्श निर्माण केला आहे. विविध संघटना, महापालिका यांनी स्थापन केलेले निर्माल्य कुंड, मूर्ती विसर्जन कुंड व मूर्तीदान केंद्राचा वापर करून उपक्रमाला उत्स्फूर्त दाद दिली. पाचव्यादिवशी सांगलीच्या विविध विसर्जन कुंडात ३५० मूर्तींचे विसर्जन करण्यात आले.
सांगलीत निसर्गपूरक उत्सवाला यावर्षी मोठा प्रतिसाद लाभताना दिसत आहे. डॉल्फिन नेचर ग्रुपने २0 वर्षांपूर्वी या उपक्रमास सुरुवात केली. आभाळमाया फाऊंडेशन, नागरिक जागृती मंच या संघटनांचीही जोड मिळाली. महापालिकेनेही या मोहिमेत उतरत प्रयत्न सुरू केले. याचा परिणाम म्हणून यावर्षी प्रथमच मोठ्या प्रमाणावर प्रदूषणमुक्त गणेश विसर्जन चळवळीत नागरिकांनी सहभाग घेतला.
नागरिक जागृती मंच, आभाळमाया फाऊंडेशनमार्फत यावेळी सांगलीत रिसाला रोड, रणझुंझार चौक, कॉलेज कॉर्नर, शामरावनगर, गावभाग येथे विसर्जन कुंड उभारले गेले. त्यात पाचव्या दिवशी ३५० मूर्तींचे विसर्जन करण्यात आले. प्लॅस्टर आॅल पॅरिस मूर्तीच्या विसर्जनासाठी आवश्यक असणारे अमोनियम बायकार्बोनेट हे केमिकल पदरमोड करून कार्यकर्त्यांनी खरेदी केले आहे. शहरात शाडूच्या मूर्ती वापराचे प्रमाण वाढत असले तरी, अजूनही पीओपीच्या मूर्तींचा वापर मोठा आहे. त्यामुळे त्यांच्या विसर्जनासाठी खास कुंड व केमिकल वापरावे लागते. नदीच्या पाण्यात या प्लास्टर आॅफ पॅरिसच्या मूर्तींचे विसर्जन अत्यंत घातक असते, त्यामुळे लोकांनी विसर्जन कुंडास प्रतिसाद देण्यास सुरुवात केली आहे.
महापौर संगीता खोत आणि आयुक्त नितीन कापडणीस यांच्याकडून या चळवळीला सकारात्मक बळ मिळत आहे. सामाजिक संघटनांना अडीच ते तीन हजार मूर्ती ठेवण्यायोग्य जागा उपलब्ध करून देण्यासाठी महापालिकेचे प्रयत्न सुरू आहेत. आयुक्त व महापौरांनी नुकतीच विसर्जन कुंडांची व्यवस्था पाहण्यासाठी भेट दिली. पुढीलवर्षी याकामी महापालिका मोठे योगदान देईल, असे सांगितले. सांगलीतील विविध संघटनांच्या प्रयत्नांचे त्यांनी कौतुकही केले.