पाणीदर येणार तीन रुपयांवर

By Admin | Updated: September 19, 2015 23:58 IST2015-09-19T23:56:19+5:302015-09-19T23:58:14+5:30

महापौरांची माहिती : व्यावसायिक पाणीपट्टीत वाढीचा विचार

Water worth three rupees | पाणीदर येणार तीन रुपयांवर

पाणीदर येणार तीन रुपयांवर

सांगली : महापालिकेच्या खासगीकरणावरून सध्या विरोधकांसह स्वकीयांनीही कॉंग्रेस नेत्यांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न चालविला आहे. अशातच महापौर विवेक कांबळे यांनी शनिवारी पाणीदर कमी करण्याची घोषणा केली. घरगुती पाणीदर प्रति हजार लिटर ८ रुपयांवरून ३ रुपयांवर आणण्यात येईल, मात्र व्यावसायिक पाणीपट्टी तसेच चुकवेगिरी करणाऱ्यांची पाणीपट्टी वाढविणार असल्याची माहिती त्यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.
पाणी खासगीकरणासाठी सत्ताधारी काँग्रेस सरसावली असतानाच, काँग्रेसचाच एक घटक असलेल्या मदनभाऊ युवा मंचने खासगीकरणालाच विरोध दर्शविला आहे. या धोरणातील त्रुटींवरच त्यांनी बोट ठेवले आहे. युवा मंचचे अध्यक्ष सतीश साखळकर यांनी राज्यातील महत्त्वाच्या महापालिकांच्या पाणीदराची कागदपत्रे गोळा करून आयुक्तांकडे सादर केली होती. राज्यात कोणत्याही महापालिकेचा दर सांगली, मिरज, कुपवाड महापालिकेएवढा नाही. याठिकाणचा दर सर्वाधिक असल्यामुळे मीटर सुरू करून पाणी आकारणी चालू झाली, तर लोकांना प्रतिमाह ५०० रुपयांपर्यंत पाणीपट्टी येऊ शकते. त्यामुळे या दराने पाणीपट्टी परवडणारी नाही, असे मत मांडले होते.
महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाचा महसूल वाढला पाहिजे. पाणीगळती रोखून जादा पाणी वापर करणाऱ्यांवर अंकुश ठेवावाच लागेल. मात्र, या गोष्टी करताना प्रामाणिक ग्राहकांवर अन्याय होता कामा नये. मीटरप्रमाणे पाणी आकारणीस कोणाचाही विरोध नाही. मात्र त्यापूर्वी अन्य महापालिकांच्या पाणीदराचा विचार करून आपला पाणीदर कमी करावा, अशी मागणी मंचच्यावतीने करण्यात आली होती. महापौर कांबळे यांनी या गोष्टीची दखल घेत पाणीदर कमी करण्याचा निर्णय लवकरच घेतला जाईल, असे सांगितले. ते म्हणाले की, पाणीपुरवठा विभागाचे खासगीकरण होत असल्याचा आरोपच चुकीचा आहे. वास्तविक प्रायोगिक तत्त्वावर या गोष्टी आम्ही करीत आहोत. एकाच अपार्टमेंटमध्ये अनेक फ्लॅटधारक असतानाही किमान सरासरी पाणीपट्टी आकारण्यात येत आहे. त्याशिवाय हॉटेल व अन्य बड्या व्यावसायिकांनाही दोन महिन्याला ३२० रुपयेच पाणीपट्टी आकारली जात आहे. या गोष्टी रोखण्यासाठी हे पाऊल उचलले आहे. महसुलातील ही कोट्यवधी रुपयांची गळती थांबविण्याचा विचार आहे. त्यामुळे मीटरप्रमाणे पाणी आकारणी हा एक चांगला व व्यावहारिकदृष्ट्या योग्य पर्याय आहे. सर्वसामान्य नागरिकांना याचा फटका बसणार नाही, याची दक्षता आम्ही घेत आहोत. त्यादृष्टीने प्रतिहजार लिटर पाणीदर ५ रुपयांनी कमी करून तो ३ रुपयांवर आणण्याचा विचार झालेला आहे. त्यादृष्टीने निर्णय घेतला जाईल. त्यामुळे नागरिकांनी काळजी करू नये, असे आवाहन त्यांनी केले. (प्रतिनिधी)

Web Title: Water worth three rupees