अतिवृष्टीमुळे वारणा नदीचे पाणी पात्राबाहेर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 18, 2021 04:18 IST2021-06-18T04:18:36+5:302021-06-18T04:18:36+5:30
१७कोकरुड०२ ते १७कोकरुड०४ : वारणा धरण क्षेत्रात मुसळधार सुरू असल्यामुळे शिराळा पश्चिम भागामध्ये वारणा नदी तुडुंब भरून वाहत आहे. ...

अतिवृष्टीमुळे वारणा नदीचे पाणी पात्राबाहेर
१७कोकरुड०२ ते १७कोकरुड०४ : वारणा धरण क्षेत्रात मुसळधार सुरू असल्यामुळे शिराळा पश्चिम भागामध्ये वारणा नदी तुडुंब भरून वाहत आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
कोकरुड : शिराळा तालुक्याच्या पश्चिम भागासह वारणा पाणलोट क्षेत्रात गेल्या दोन दिवसांपासून अतिवृष्टी होत आहे. वारणा नदीचे पाणी पात्राबाहेर गेले असून नदीवर असणारा कोकरुड ते रेठरे आणि मेणी ओढ्यावरील येळापूर ते समतानगर पूल पाण्याखाली गेले आहेत. प्रवासी, वाहनधारकांना अन्य पर्यायी मार्गाचा शोध घ्यावा लागत आहे.
गेल्या आठ दिवसांत शिराळा पश्चिम भागातील अनेक ठिकाणी तुरळक पाऊस सुरू होता. काही ठिकाणी मुसळधार पावसाच्या सरी पडत होत्या. बुधवारी सकाळपासून मान्सूनच्या जोरदार पावसास सुरुवात झाल्याने गावातील ओढे, नाले भरुन वाहत होते. दिवसभर पडणाऱ्या पावसामुळे सायंकाळी वारणा नदीचे पात्र तुडुंब भरून वाहत असल्याने शाहूवाडी तालुक्याला जोडणारा वारणा नदीवरील कोकरुड ते रेठरे दरम्यानचा पूल पाण्याखाली गेला आहे. या मार्गावरून होणारी वाहतूक नेर्ले, चरण या पर्यायी मार्गाने सुरू झाली आहे. चांदोली धरणासह वारणा पाणलोट क्षेत्रात अतिवृष्टी सुरू असल्याने नदीचे पाणी पात्राबाहेर पडले आहे. येळापूर, मेणीसह पाचगणी पठारावर मोठ्या प्रमाणात पर्जन्यवृष्टी झाल्याने ओढ्याला पूर येऊन येळापूर ते समतानगर पूल बुधवारी पाण्याखाली गेल्याने समता नगर, दीपकवाडी, कांबळेवाडी, हाप्पेवाडी येथील लोकांना दोन किलोमीटर अंतरावरून प्रवास करावा लागला. मुसळधार पावसाने खरीप हंगामात पेरणी केलेल्या शेतांचे बांध फुटल्याने उगवण झालेल्या शेतातील माती वाहून गेल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे.