जत तालुक्यात पाणीटंचाईच्या झळा

By Admin | Updated: April 18, 2015 00:08 IST2015-04-17T23:09:40+5:302015-04-18T00:08:46+5:30

उन्हा-तान्हात पायपीट : प्रशासनाकडून टँकर सुरू करण्यास चालढकल

Water turbidity in Jat taluka | जत तालुक्यात पाणीटंचाईच्या झळा

जत तालुक्यात पाणीटंचाईच्या झळा

संख : कोरड्या पडलेल्या कूपनलिका, कमी झालेली पाण्याची पातळी, अत्यल्प पडलेला पाऊस, वाढत्या उन्हाची तीव्रता, रिमझिम अवकाळी पाऊस, तसेच कायमस्वरूपी नळपाणी योजनांच्या अभावामुळे कायम दुष्काळग्रस्त जत तालुक्यातील १७ गावांत व त्याखालील वाड्या-वस्त्यांवर पाणीटंचाई जाणवू लागली आहे. काही गावांतील वाड्या-वस्तीवर पाण्याची तीव्र टंचाई निर्माण झाली आहे. शाळकरी मुलांना उन्हा-तान्हात हंडा, घागर घेऊन पायपीट करावी लागत आहे. दरम्यान, उमराणी येथे टॅँकरने पाणीपुरवठा सुरू आहे व जिल्ह्यातील हा पहिला पाणी टॅँकर आहे.
तालुक्यामध्ये दुष्काळ हा पाचवीला पूजलेला आहे. गेल्या चार वर्षांपासून पाऊस अत्यल्प पडल्यामुळे खरीप व रब्बी हंगाम वाया गेले होते. मात्र यावर्षी जून महिन्यापासून पावसाने थोड्या प्रमाणात हजेरी लावली होती. त्यानंतर सप्टेंबर महिन्यामध्ये दमदार हजेरी लावली होती. एकूण ४५७ मि.मी. पाऊस झाला आहे. पाण्याची पातळी १.५७ मीटरने वाढली होती. परंतु भूभाग अच्छिद्र स्वरुपाचा खडक असल्याने पाणी साठवून ठेवण्याची क्षमता नाही. पाण्याचा उपसाही अवाजवी झाला आहे.
सध्या उन्हाची तीव्रता दिवसेंदिवस वाढू लागली आहे. विहिरी, कूपनलिका, साठवण तलावातील पाण्याची पातळी घटली आहे. तालुक्यात संख व दोड्डनाला हे मध्यम प्रकल्प असून २६ तलाव आहेत. दोन्ही मध्यम प्रकल्पांतील एकूण पाणीसाठा मृतसंचयाखाली आहे. २६ तलावांपैकी खोजानवाडी, दरीबडची, बेळुुंखी, उमराणी हे ४ तलाव कोरडे पडले आहेत. सिद्धनाथ, सोरडी, गुगवाड, मिरवाड, तिकोंडी १ व २, डफळापूर, बिळूर या ८ तलावांतील पाणीसाठा मृत संचयाखाली आहे. मागील तीन महिन्यात उर्वरित तलावांतील पाणीसाठा कमी झाल्याने तीव्र पाणीटंचाई जाणवू लागली आहे.
जत पश्चिम भागात म्हैसाळचे पाणी आल्याने हा भाग वगळता जत पूर्व, दक्षिण व उत्तर भागात आतापासूनच पाणीटंचाई जाणवू लागली आहे. तालुक्यातील खोजानवाडी, कुडनूर, उमदी, बेळुंखी, अंकलगी, उमराणी, वज्रवाड, मुचंडी, हळ्ळी, बेळोंडगी, बालगाव, करजगी, माडग्याळ, गुड्डापूर, वळसंग, सनमडी, कुणीकोणूर, लमाणतांडा (दरीबडची) या १८ गावांमध्ये पाणीटंचाई निर्माण झाली आहे.
त्याखालील वाड्या-वस्तीवर पाणीटंचाईची भीषणता अधिक आहे. ग्रामस्थांना वणवण भटकंती करावी लागत आहे.
प्रशासनाने तात्पुरती उपाययोजना म्हणून खोजानवाडी येथील कूपनलिका अधिग्रहण करून तेथील नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याची सोय करण्यात आली आहे. दोड्डनाला, भिवर्गी प्रकल्पासह अंकलगी, संख तलावासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी १५ दिवसांपूर्वीच उपसाबंदी लागू केली. मात्र त्याची अंमलबजावणी होत नाही. उमदी, संख, माडग्याळ, बेळुुंखी, बालगाव, अंकलगी आदी गावात नळ पाणीपुरवठा योजनांतून पाणी मिळते. त्याखालील वाड्या-वस्तीवर गेल्या दीड महिन्यापासून पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. प्रांताधिकारी प्रमोद गायकवाड, तहसीलदार अभिजित पाटील-सावर्डेकर यांनी माडग्याळ येथील पाण्याची पाहणी केली आहे. ग्रामस्थांनी टॅँकर सुरू करण्याची मागणी केली, मात्र प्रशासनाकडून दखल घेतली जात नाही, असा ग्रामस्थांचा आरोप आहे.

Web Title: Water turbidity in Jat taluka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.