माधवनगरसह सात गावांचा पाणीपुरवठा बंद

By Admin | Updated: December 16, 2015 00:12 IST2015-12-15T23:51:48+5:302015-12-16T00:12:49+5:30

वीज तोडली : १७ लाखांची थकबाकी; ग्रामस्थांची पाण्यासाठी भटकंती सुरू

Water supply to seven villages with Madhavnagar is closed | माधवनगरसह सात गावांचा पाणीपुरवठा बंद

माधवनगरसह सात गावांचा पाणीपुरवठा बंद

सांगली/माधवनगर : मिरज तालुक्यातील माधवनगरसह सात गावांच्या पाणी पुरवठा योजनेच्या विजेची थकबाकी १७ लाखांच्या घरात गेल्याने, महावितरणने योजनेचा वीज पुरवठा बंद केला आहे. त्यामुळे गेल्या पाच दिवसांपासून या सातही गावांचा पाणी पुरवठा बंद झाल्याने ग्रामस्थांची पाण्यासाठी भटकंती सुरु झाली आहे. सातही गावांनी पैसे भरण्यासाठी प्रयत्न सुरु केले आहेत. परंतु तरीही आणखी तीन ते चार दिवस योजना बंदच राहणार आहे.
माधवनगरच्या पाणी योजनेत बुधगाव, कवलापूर, बिसूर, खोतवाडी, सांबरवाडी व कांचनपूर या गावांचा समावेश आहे. दिवाळीपासून या सातही ग्रामपंचायतींनी महावितरणकडे वीज बिलाचे पैसे वेळेत न भरल्याने सातही गावांवर पाणी पुरवठा बंद होण्याचा प्रसंग आला आहे. यापूर्वी याच कारणाने अनेकदा वीज कनेक्शन तोडल्याने पाणी पुरवठा बंद झाला होता. माधवनगर ग्रामपंचायत वीज बिलाच्या पैशाची थोडीफार तरतूद करते. पण इतर गावांची आर्थिक परिस्थिती बिकट आहे. त्यास अनेक कारणे असून, मुख्य कारण गावातील घरपट्टी व पाणीपट्टीची वसुली करण्यात ही गावे अयशस्वी ठरत असल्याने ग्रामपंचायतीकडे पाणी पुरवठा व वीज पुरवठ्यासाठी रकमेची जुळणी होणे जिकिरीचे होऊन बसले आहे. सध्या या गावांसाठी सात गावांची शिखर परिषद असून, तिच्यामार्फत योजना चालविली जात आहे. पण आर्थिक मिळकतीचे ठोस साधन नसल्याने ही शिखर परिषद कमकुवत ठरली आहे.
दोन ते तीन महिन्यांतून या गावातील पाणी पुरवठा बंद झाल्याने ग्रामस्थांना कृष्णा नदी जवळ असूनही पाण्यासाठी वणवण फिरावे लागते. याला प्रशासन कारणीभूत असून ग्रामस्थांकडून वसुली वेळेत झाल्यास योजना व पाणी पुरवठा सुरळीत सुरु राहू शकते. पण योजना सुरु झाल्यापासून ते आजअखेर कोणत्याही गावाने वसुलीकडे लक्ष न दिल्याने ग्रामस्थांकडे लाखो रुपयांची थकबाकी अडकून पडली आहे. काही ग्रामस्थ प्रामाणिकपणे घर व पाणीपट्टी प्रत्येकवर्षी भरतात. पण हे प्रमाणही अत्यंत कमी आहे. थकबाकीचा आकडा दिवसेंदिवस वाढत असल्याने पाणीपट्टी व वीज बिल भरायचे कसे? असा ग्रामपंचायतींनाप्रश्न पडला आहे. (प्रतिनिधी/वार्ताहर)


पैशाची जुळवाजुळव सुरू
सातही गावांची विजेची थकबाकी १७ लाखांच्या घरात गेली आहे. त्यामुळे महावितरणने पाच दिवसांपूर्वी योजनेचा वीज पुरवठा बंद केला आहे. सध्या किमान १० लाख रुपये भरल्याशिवाय वीज पुरवठा सुरु करणार नाही, असा इशारा महावितरणच्या अधिकाऱ्यांनी दिला आहे. त्यामुळे माधवनगर, बुधगाव व कवलापूर या तीन गावांनी प्रत्येकी तीन लाख व लहान गावांनी एक लाख रुपये जमा केले, तर दहा लाख भरता येणार आहेत. सध्या तरी आता एकाही ग्रामपंचायतीकडे एवढी रक्कम नाही. तरीही त्यांच्याकडून पैशाची जुळवाजुळव सुरु आहे. अजून तीन ते चार दिवस योजना बंदच राहणार आहे.


ग्रामपंचायत : लक्ष टंचाई निधीकडे
सातही ग्रामपंचायतींकडे वीज बिलाची रक्कम भरण्याची आर्थिक क्षमता नसल्याने, जिल्हा परिषदेकडे जमा होणाऱ्या टंचाई निधीकडे या ग्रामपंचायती डोळे लावून बसतात. यापूर्वी अनेकदा शासनाच्या या निधीचा लाभ सातही गावांनी घेतला आहे. शासनाकडून टंचाई निधीअंतर्गत निधी मिळेल व पाणी टंचाई संपेल, अशी अपेक्षा या ग्रामपंचायतींना आहे.

Web Title: Water supply to seven villages with Madhavnagar is closed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.