पाणीपुरवठा विभागात ‘खळळ्-खट्याक’

By Admin | Updated: February 23, 2015 23:56 IST2015-02-23T23:29:44+5:302015-02-23T23:56:52+5:30

दूषित पाणीपुरवठ्याबाबत संताप : कार्यालयाच्या काचा फोडून मोडतोड

In the water supply department, 'Khaal-Khatyak' | पाणीपुरवठा विभागात ‘खळळ्-खट्याक’

पाणीपुरवठा विभागात ‘खळळ्-खट्याक’

सांगली : महापालिका क्षेत्रातील जनतेला दूषित पाण्याचा पुरवठा केला जात आहे, असा आरोप करीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी आज, सोमवारी हिराबाग येथील पाणीपुरवठा कार्यालयात तोडफोड केली. त्यांच्या ‘खळ्ळ्-खट्याक’ आंदोलनामुळे पाणीपुरवठा विभागात पळापळ सुरू झाली. पोलिसांनी आंदोलनकर्त्यांना अडविल्याने आंदोलनकर्ते निवेदन देऊन परतले. माजी आमदार नितीन शिंदे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. सकाळी अकरा वाजता पंचवीस कार्यकर्त्यांसह ते हिराबाग येथील पाणीपुरवठा कार्यालयात दाखल झाले. दूषित पाणीपुरवठ्याबद्दल महापालिकेचा निषेध करीत त्यांनी जोरदार निदर्शने केली. त्यानंतर कार्यालयात गेल्यानंतर कार्यकर्त्यांनी लाथा घालून काचा फोडल्या. फर्निचरचीही मोडतोड केली. आंदोलनाची माहिती मिळाल्यानंतर पोलीस याठिकाणी आले. त्यांनी आंदोलनकर्त्यांना अडविले. निवेदन देऊन शांततेने आंदोलन करण्याचे आवाहन पोलिसांनी केले. त्यामुळे याठिकाणच्या अधिकाऱ्यांना मनसे कार्यकर्त्यांनी निवेदन दिले.
निवेदनात म्हटले आहे की, सांगली, मिरज आणि कुपवाड महापालिका क्षेत्रातील साडेपाच लाख लोकांना महापालिका पाणीपुरवठा करते. ६५ हजार ग्राहकांकडून दरवर्षी वीस ते बावीस कोटी रुपये पाणीपट्टी वसूल केली जाते. त्यामुळे नागरिकांना शुद्ध पाणीपुरवठा करण्याची जबाबदारी महापालिकेची आहे. तरीही माळबंगला व हिराबाग येथील जलशुद्धीकरण केंद्रांमध्ये सध्या ढिसाळ कारभार सुरू आहे. त्यामुळे शुद्धीकरणाची प्रक्रिया व्यवस्थित पार पाडली जात नाही. महापालिका क्षेत्रात गॅस्ट्रोने १३ जणांचा बळी गेल्यानंतरही नागरिकांच्या जिवाशी खेळ करण्याचा प्रकार सुरूच आहे. जलशुद्धीकरण केंद्रातच घाणीचे साम्राज्य पसरले आहे. त्यामुळे बेजबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई करावी. येत्या आठ दिवसांत शुद्ध पाणीपुरवठा न झाल्यास आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे. आंदोलनात स्वाती शिंदे, आदित्य पटवर्धन, चेतन भोसले, निखिल जगताप, प्रियानंद कांबळे, रामभाऊ सूर्यवंशी, बाजीराव गस्ते, गजानन कांबळे, रोहित घुबडे-पाटील आदी सहभागी झाले होते. (प्रतिनिधी)


विश्रामबागमध्ये अशुद्ध पाणीपुरवठा
विश्रामबाग येथील दत्तनगर, महालक्ष्मी चौक, सावरकर कॉलनी, नागराज कॉलनी परिसरात गेल्या काही दिवसांपासून अशुद्ध व गढूळ पाण्याचा पुरवठा सुरू असून, नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. याबाबत येथील नागरिकांनी आज, सोमवारी महापालिका आयुक्तांना निवेदन दिले. निवेदनात त्यांनी म्हटले आहे की, दूषित पाणीपुरवठ्यामुळे येथील नागरिकांच्या आरोग्याशी खेळ सुरू आहे. पाण्याला दुर्गंधीही येत आहे. पाणीपुरवठा विभागाकडे याबाबत विचारणा केल्यानंतर व्यवस्थित उत्तर दिले जात नाही. नागरिकांच्यादृष्टीने हा जिव्हाळ्याचा प्रश्न असून महापालिका आयुक्तांनी याप्रकरणी लक्ष द्यावे, अशी मागणी करण्यात आली. नागरिकांनी गढूळ पाण्याच्या बाटल्याही आयुक्तांना दाखविल्या. आयुक्तांनी याबाबत तपासणीचे आदेश पाणीपुरवठा विभागाला दिले आहेत. निवेदन देतेवेळी सुनील पट्टणशेट्टी, कौस्तुभ कुलकर्णी, अनिकेत मिक्कल, सतीश जगदाळे, सूरज शरणाथे, राजू बंडगर आदी उपस्थित होते.

Web Title: In the water supply department, 'Khaal-Khatyak'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.