ऐन गणेशोत्सवात सांगलीत पाणीटंचाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2021 04:26 IST2021-09-11T04:26:22+5:302021-09-11T04:26:22+5:30
सांगली : ऐन गणेशोत्सवात सांगली व कुपवाड या दोन शहरात पाणीपुरवठा विस्कळीत झाला आहे. शनिवारीही दोन्ही शहराला अपुरा व ...

ऐन गणेशोत्सवात सांगलीत पाणीटंचाई
सांगली : ऐन गणेशोत्सवात सांगली व कुपवाड या दोन शहरात पाणीपुरवठा विस्कळीत झाला आहे. शनिवारीही दोन्ही शहराला अपुरा व कमी दाबाने पाणीपुरवठा होणार आहे.
शहरात गणेशोत्सवाची धामधूम सुरू आहे. अशातच महापालिकेच्या माळबंगला येथील जलशुद्धीकरण केंद्रातील ५६ एमएलडी पंपगृहाच्या रायझिंग मेनला मोठी गळती लागली. त्यामुळे शुक्रवारी अनेक भागांत पाणीपुरवठा खंडित झाला. महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने गळती काढण्याचे काम युद्धपातळीवर हाती घेतले आहे. हे काम सायंकाळपर्यंत पूर्ण होण्याची शक्यता आहे.
त्यामुळे शनिवारी माळबंगला, आरटीओ कार्यालय, संजयनगर, यशवंतनगर, आपटा पोलीस चौकी, वसंत काॅलनी, जयहिंद काॅलनी, वाल्मीकी आवास येथील पाण्याच्या टाक्या पूर्णक्षमतेने भरल्या जाणार नाही. परिणामी सांगली व कुपवाड या शहराला कमी दाबाने व अपुरा पाणीपुरवठा होणार आहे. नागरिकांनी पाण्याचा काटकसरीने वापरून महापालिकेस सहकार्य करावे, असे आवाहन पाणीपुरवठा अभियंता पी. एम. हलकुडे यांनी केले आहे.