पाणी योजनांची त्रयस्थ यंत्रणेकडून चौकशी होणार
By Admin | Updated: September 11, 2014 23:06 IST2014-09-11T22:38:13+5:302014-09-11T23:06:35+5:30
ठेकेदार अडचणीत : टाकळी-बोलवाड, लवंगा, गिरगावचा समावेश

पाणी योजनांची त्रयस्थ यंत्रणेकडून चौकशी होणार
मालगाव : सध्या वादात सापडलेल्या जिल्ह्यातील मिरज तालुक्यातील टाकळी-बोलवाड, जत तालुक्यातील गिरगाव व लवंगा तीन पाणी पुरवठा योजनांची त्रयस्थ यंत्रणेमार्फत चौकशी होणार आहे. प्रशासनाने चौकशीची जबाबदारी वालचंद अभियांत्रिकी महाविद्यालय या त्रयस्थ यंत्रणेकडे सोपविली आहे. प्रशासनाने घेतलेल्या या निर्णयामुळे योजनेशी संबंधितांमध्ये चौकशीच्या भीतीने खळबळ उडाली आहे.
जिल्ह्यात राष्ट्रीय पेयजल योजनेअंतर्गत पाणीपुरवठा योजनांना मंजुरी देण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत भारत निर्माण योजनेचे काम वाढत्या तक्रारीमुळे वादग्रस्त बनले आहे. निधी खर्च होऊनही योजना अपुऱ्या असल्याच्या तक्रारी आहेत. योजनांच्या कामांच्या चौकशीसाठी आंदोलने झाली; मात्र ही आंदोलने फारशी तग धरू शकली नाहीत. स्थानिक पातळीवर तडजोडींमुळे रखडलेल्या योजनांची सखोल चौकशी होऊ शकली नाही. त्यामुळे अध्यक्ष, सचिव, ठेकेदार व तांत्रिक सल्लागारांना अभय मिळत असल्याचे चित्र आहे. मात्र जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली असलेल्या भ्रष्टाचार निर्मूलन समितीकडे ज्या पाणी पुरवठा योजनांच्या कामांच्या तक्रारी दाखल झाल्या आहेत, अशा योजना चौकशीच्या फेऱ्यात अडकल्या आहेत.
भ्रष्टाचार निर्मूलन समितीकडे दाखल झालेल्या पाणी पुरवठा योजनांच्या तक्रारींची दखल घेऊन जिल्हाधिकाऱ्यांनी वादग्रस्त योजनांचे थर्ड पार्टी आॅडिट (त्रयस्थ यंत्रणेमार्फत चौकशी) करण्याचे आदेश दिले आहेत. या आदेशानुसार जि. प. मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी मिरज तालुक्यातील टाकळी - बोलवाड व जत तालुक्यातील गिरगाव व लवंगा या गावच्या वादग्रस्त पाणीपुरवठा योजनांची चौकशी करण्याचे आदेश त्रयस्थ यंत्रणेला दिले आहेत. त्रयस्थ यंत्रणा म्हणून वालचंद अभियांत्रिकी महाविद्यालयावर जबाबदारी सोपविण्यात आली आहे. (वार्ताहर)
ग्रामपंचायतींना शुल्क द्यावे लागणार !
या महाविद्यालयाला चौकशी कामाचे द्यावे लागणारे शुल्क संबंधित गावच्या ग्रामपंचायतींकडून घेण्यात यावेत, असे आदेश आहेत. त्यामुळे ग्रामपंचायतींना आकारणी करण्यात येणारे हे शुल्क पाणीपुरवठा विभागाकडे भरावे लागणार आहे.
कामांच्या चौकशीचे आदेश त्रयस्थ यंत्रणेला दिल्याने चौकशीच्या भीतीने तीनही गावच्या पाणीपुरवठा योजनेचे अध्यक्ष, सचिव, ठेकेदार व तांत्रिक सल्लागारांचे धाबे दणाणले आहेत.