मिरजेत १३ ठिकाणी पाण्याचे नमुने दूषित
By Admin | Updated: November 26, 2014 00:05 IST2014-11-25T00:48:46+5:302014-11-26T00:05:24+5:30
पाणी तपासणी : नगरसेविकांची मोहीम; नागरिकांनी जाब विचारल्याने अधिकाऱ्यांची तारांबळ

मिरजेत १३ ठिकाणी पाण्याचे नमुने दूषित
मिरज : मिरजेतील गॅस्ट्रो साथीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी नगरसेवकांनी शहरात विविध ठिकाणी पाण्याचे नमुने तपासले असता, १३ ठिकाणी पाणी दूषित असल्याचे आढळले. नागरिकांनी व महिलांनी महापालिकेच्या अधिकाऱ्यांचा उध्दार करीत दूषित पाण्याबाबत जाब विचारल्याने महापालिका अधिकाऱ्यांची तारांबळ उडाली. अयुक्त अजिज कारचे यांनी महापालिका अधिकाऱ्यांचा बचाव करीत, चुकीच्या पध्दतीने पाणी तपासणी करण्यात येत असल्याचा आरोप केल्याने त्यांची नगरसेवकांसोबत वादावादी झाली.
विरोधी पक्षनेते दिग्विजय सूर्यवंशी, नगरसेविका सौ. प्रार्थना मदभावीकर, संगीता हारगे, जुबेर चौधरी, कांचन भंडारे, राष्ट्रवादी महिला अध्यक्षा राधिका हारगे, माजी नगरसेवक प्रसाद मदभावीकर यांनी मिरजेचे पाणी पुरवठा अभियंता बी. एस. पाटील, शाखा अभियंता जे. एम. सोनी यांना सोबत घेऊन शहरात शनिवार पेठ, मार्केट परिसर, नरवाडे चौक, गवळी गल्ली, हारगे गल्ली, कनवाडकर हौद, ब्राह्मणपुरी, साठेनगर, म्हेत्रे गल्ली, स्फूर्ती चौक, तांबट बोळ, स्टॅँड परिसरात २० ठिकाणी नागरिकांच्या घरांतील पिण्याच्या पाण्याचे नमुने घेऊन पाण्याची शुध्दता तपासली. नगरसेवकांनी पाणी तपासणीसाठी लागणारी रसायने व परीक्षानळ्या सोबत घेतल्या होत्या. तपासणीत १३ ठिकाणी पाणी पिण्यास अयोग्य असल्याचे आढळले. यामुळे संतप्त झालेले काही नागरिक अधिकाऱ्यांच्या अंगावर धावून गेले. दूषित पाणीपुरवठ्यामुळे झालेल्या नुकसानीस व आजाराला जबाबदार कोण?, असा त्यांना जाब विचारला असता, अधिकारी निरूत्तर झाले. नळाला नेहमी दुर्गंधीयुक्त पाणी येत असल्याची तक्रार नागरिकांनी केली. आयुक्त अजिज कारचे यांना नगरसेवकांनी दूरध्वनीवरून अशुध्द पाण्याचा पुरवठा होत असल्याचे सांगितल्यानंतर आयुक्तांनी, तुम्ही चुकीच्या पध्दतीने पाणी तपासणी करीत आहात, असे सुनावल्याने नगरसेवक व आयुक्तांची वादावादी झाली. विरोधी पक्षनेते दिग्विजय सूर्यवंशी यांनी आयुक्तांना दूरध्वनी करून पाणी दूषित असल्याचे व नागरिकांच्या भावना तीव्र आहेत, असे सांगितले. गेले वर्षभर सातत्याने ड्रेनेज वाहिन्या साफ करण्यासाठी, कामगारांची नियुक्ती अथवा कंत्राटी पध्दतीने कामगार घेण्याच्या मागणीसाठी आयुक्तांकडे पाठपुरावा केला. मात्र महापालिकेने कोणतीही कार्यवाही केली नाही. पाणीपुरवठा अधिकाऱ्यांना वारंवार सूचना देऊनही पाणी शुध्दीकरणासाठी कोणतीही उपाययोजना करण्यात आली नसल्याने गॅस्ट्रोची साथ सुरू असल्याचा आरोप नगरसेविका प्रार्थना मदभावीकर यांनी केला. पाठक रुग्णालयातील रुग्णांना भेटी दिल्या. रोहन भंडारे, विजय माळी, चंद्रकांत जगताप, मिलिंद हारगे, उमेश मिरजे व नागरिक उपस्थित होते. (वार्ताहर)