पाण्याची शुद्धता वाऱ्यावरच
By Admin | Updated: July 26, 2014 00:31 IST2014-07-26T00:30:23+5:302014-07-26T00:31:20+5:30
गढूळ, मातीमिश्रित पाणीपुरवठा : आवश्यक तपासणी नाही

पाण्याची शुद्धता वाऱ्यावरच
सांगली : सांगली-मिरज-कुपवाड शहरातील पाच लाख लोकसंख्येला पुरवठा होणाऱ्या पिण्याच्या पाण्याची शुद्धता कोणत्याही कसोटीवर खरी उतरण्याची शक्यता नाही. महापालिकेकडून दररोज पाण्याचे नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेत जातात. काही मोजक्याच चाचण्या करून अहवाल दिला जाते, पण या चाचणीत पाणी दूषित निघतच नाही. उलट नागरिकांना मात्र कधी मातीमिश्रित, तर कधी दुर्गंधीयुक्त पाण्याचा पुरवठा होत असतो. त्यामुळे पाण्याच्या शुद्धतेविषयी नागरिकही साशंक आहेत.
गेल्या दोन दिवसांपासून सांगली व कुपवाड शहराला मातीमिश्रित पाण्याचा पुरवठा झाला. नळाला लालभडक पाणी आल्याने महापालिकेच्या शुद्धीकरण यंत्रणेचे पितळ उघडे पडले. त्यात नगरसेवकांनी जलशुद्धीकरण केंद्राची पाहणी करून प्रशासनाच्या कारभाराचे वाभाडे काढले. माळबंगला येथील जलशुद्धीकरण केंद्रातील तीनपैकी दोन बेड बंद होते. एका बेडवरून पाणी शुद्ध करून पुरवठा होत होता. हा प्रकार गेले कित्येक दिवस सुरू आहे. माळबंगला येथील शुद्धीकरण केंद्राच्या दुरुस्तीचे काम सुरू असल्याने एक क्लॅरिफायर व एक फिल्टर बेड बंद आहे. त्याचे काम प्रगतीपथावर असल्याचे प्रशासनाकडून सांगितले जात आहे. वास्तविक दुरुस्तीचे काम गेल्या काही महिन्यांपासून हाती घेण्यात आले आहे. म्हणजेच काम सुरू झाल्यापासून सांगलीकरांना अशुद्ध पाण्याचा पुरवठा झाला, असेच म्हणावे लागेल. तरीही पाण्याचे नमुने कधीच दूषित आढळले नाहीत.
जून महिन्यात केलेल्या चाचणीत एकदाही दूषित पाणी आढळले नसल्याचा दावा प्रशासनाने केला आहे. मातीमिश्रित गढूळ पाणी नागरिकांच्या गळी उतरवूनही, प्रशासन मात्र हे पाणी पिण्यालायक असल्याचे सांगत आहे. वास्तविक महापालिकेकडून दररोज वेगवेगळ्या भागातील पाण्याचे नमुने शासकीय प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविले जातात. सांगलीत १० ते ११ जागी, तर मिरजेत पाच ठिकाणचे नमुने घेतले जातात. पंधरा ते सोळा नमुन्यांपैकी सात ते आठ नमुनेच प्रयोगशाळेकडे जातात. महिन्याची सरासरी पाहिल्यास, दरमहा पाण्याचे २५० नमुने प्रयोगशाळेकडे जात आहेत. महापालिकेकडे पाणी तपासणीची कसलीही यंत्रणा नसल्यामुळे नागरिकांना दूषित पाणी प्यावे लागत आहे. त्यामुळे जिल्हा शासकीय प्रयोगशाळेतच पाण्याच्या नमुन्यांची तपासणी होते. प्रयोगशाळेत शुद्ध पाण्यासाठी प्रमाणकानुसार ६५ तपासण्या करण्याची गरज आहे. वस्तुत: केवळ वीसच तपासण्या केल्या जातात. त्यामुळे शहरात होणारा पाणीपुरवठा शुद्ध होतो का, असा प्रश्न समोर उभा आहे. (प्रतिनिधी)