दीडशे वाड्यांत ‘पाणी’बाणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 26, 2015 00:54 IST2015-05-25T23:15:55+5:302015-05-26T00:54:29+5:30
रत्नागिरी जिल्हा : विहिरी आटल्या अन् घसे सुकले

दीडशे वाड्यांत ‘पाणी’बाणी
रत्नागिरी : गतवर्षीपेक्षा यंदा जिल्ह्यात पाणीटंचाई कमी असून, ७४ गावांतील १५९ वाड्यांमधील जनतेची पाण्यासाठी तडफड सुरु आहे. शासनाकडून करण्यात येणारा पाणी पुरवठा अपुरा पडत आहे.
जिल्ह्यात पडणारा अवेळी पाऊस, गारा यांमुळे गतवर्षीपेक्षा यंदा पाणीटंचाईचे प्रमाण निम्म्यावर आले आहे. कडक उन्हामुळे अंगाची लाहीलाही होत असल्याने लोक हैराण झाले आहेत. त्यातच नाले, ओढे, विहिरी, विंधण विहिरी आटल्याने टंचाईग्रस्त गावांतील जनावरेही पाण्यासाठी तडफडत आहेत.
अवकाळी पावसामुळे पाण्याचे संकट कमी झाले असले तरीही ज्या ज्या ठिकाणी टंचाई जाणवत आहे, त्याठिकाणी ती खूपच भीषण स्वरुपात जाणवत आहे. मैलोन्मैल पायपीट करूनही पाणी मिळत नसल्याने ग्रामीण भागातील महिलावर्ग वैतागला आहे. विहीरीचे तळही आटले असून पाण्याचा कोणताही स्त्रोत गावात शिल्लक नसल्याने महिलांची कुचंबणा झाली आहे.
आज जिल्ह्यातील टंचाईग्रस्तांचा आढावा घेतला असता जिल्ह्यात ७४ गावातील १५९ वाड्यांमध्ये पाणीटंचाईचा उद्रेक झाला आहे. या टंचाईग्रस्तांना एक ते दोन दिवसआड टँकरने पाणीपुरवठा करण्यात येत आहे. गतवर्षीच्या उन्हाळ्यामध्ये आजच्या दिवशी ९४ गावांतील २०४ वाड्यांना २४ टँकरद्वारे पाणी पुरवठा करण्यात येत होता.
डोंगरदऱ्यात वसलेल्या धनगरवाड्यांतील लोकांना दरवर्षीप्रमाणे यंदाही भीषण पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. कारण ह्या वाड्या डोंगरदऱ्यामध्ये वसल्या असल्याने पाण्याची पातळी खालावली आहे. त्यामुळे येथील विहिरी, विंधन विहिरी, ओढे, झरे आदी आटल्याने रहिवाशांना पाण्यासाठी वणवण भटकंती करावी लागते. टंचाईग्रस्तांमधील अनेक वाड्यांमध्ये पाण्याचा टँकर नेताना चालकाला मोठी कसरतही करावी लागते.
या टंचाईग्रस्तांना ११ शासकीय आणि ११ खासगी अशा एकूण २२ टँकर्सद्वारे पाणी पुरवठा करण्यात येत आहे. टंचाईग्रस्तांची संख्या दिवसेंदिवस वाढत असली तरी अवेळी पडणाऱ्या पावसाचा परिणाम म्हणून गतवर्षीपेक्षा ती कमीच आहे. कारण पावसाचे पाणी जमिनीत झिरपल्याने पाण्याची पातळी खालावत नाही. मात्र, ज्या गावातील वाड्यांमध्ये सध्या पाणीटंचाई सुरु आहे. त्या गावातील ग्रामस्थांची पाण्यासाठी तडफड सुरु आहे.
त्यांना फक्त पिण्याच्या पाण्याचा पुरवठा होत आहे. मात्र, इतर वापरासाठी लागणारे पाणी कुठून आणणार असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे. त्यामुळे पाण्यासाठी टंचाईग्रस्त भागातील लोकांचे हाल होत आहेत. पाण्याचे टँकर पुरवण्यास जिल्हा प्रशासनही कमी पडले असल्याचे यावरून दिसून येते. (शहर वार्ताहर)
केवळ २२ टँकर्स