ड्रेनेजअभावी मोकळ्या जागेत सांडपाणी
By Admin | Updated: May 20, 2016 23:38 IST2016-05-20T23:30:15+5:302016-05-20T23:38:21+5:30
गव्हर्न्मेंट कॉलनी : महापालिका होऊनही समस्या कायम; रस्ते, गटारींपासून वंचित

ड्रेनेजअभावी मोकळ्या जागेत सांडपाणी
सांगली : ग्रामपंचायतीची नगरपालिका झाली, महापालिका झाली, तरी गव्हर्न्मेंट कॉलनी, सहयोगनगर, पद्मावतीनगर, हसनी आश्रम, स्वप्ननगरी, वृंदावन व्हिला परिसर अजूनही विकासापासून वंचित आहे. काही समस्या सुटल्या असल्या तरी, सांडपाण्याचा निचरा करणारी व्यवस्थाच नसल्याने नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे.
मोकळ्या प्लॉटमध्ये साचलेले सांडपाणी, काटेरी झुडपांचे जंगल, रस्त्यांची दुरवस्था, कचरा उठावास होणारा विलंब... अशा कित्येक समस्यांनी हा परिसर त्रस्त झाला आहे. शुक्रवारी ‘लोकमत आपल्या दारी’ या उपक्रमात या परिसरातील नागरिकांनी आपल्या समस्यांना वाचा फोडली.
सर्वात वेगाने विकसित होत असलेल्या या परिसरात समस्याही तितक्याच आहेत. अनेकांनी प्लॉट खरेदी केले, पण पुन्हा ते त्याकडे फिरकलेच नाहीत. आज या मोकळ्या प्लॉटमध्ये काटेरी झुडपे मोठ्या प्रमाणात आहेत. त्यातून अपार्टमेंटची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. ड्रेनेज व्यवस्था नसल्याने अपार्टमेंटमधील सांडपाणी अशा मोकळ्या प्लॉटमध्ये सोडले जाते. काहीवेळा तर ते सांडपाणी रस्त्यावरून जात असते.
या परिसरात शुद्ध पाणीही येत नाही. पाण्यात तुरटी फिरविली तर गाळ दिसून येतो. अनेक रस्त्यांवर अतिक्रमणे झाली आहेत. कचरा कुंड्यांची स्वच्छता होत नाही. काही भागात घंटागाडी आठवड्यातून दोनदाच येते. स्फूर्ती चौकात पावसाचे पाणी घरांत शिरते. सर्व्हे नंबर १३३ ते १३५ मध्ये रस्त्याचे आरक्षण पडले आहे. तिथे ३० ते ४० वर्षापासून लोक राहत आहेत. मोकाट जनावरांचाही नागरिकांना त्रास होतो. रात्रीच्यावेळी साप रस्त्यावरून फिरत असतात. रस्ते रुंदीकरणही प्रलंबित आहे, अशा अनेक तक्रारी व समस्या नागरिकांनी मांडल्या.