जतमध्ये कचरा डेपोतच टाकला मैला

By Admin | Updated: March 30, 2015 00:17 IST2015-03-29T23:36:26+5:302015-03-30T00:17:33+5:30

नगरपालिकेचा कारभार : नागरिकांचे आरोग्य धोक्यात; मोकाट कुत्र्यांचा वावर वाढला

The waste in the garbage was scratched | जतमध्ये कचरा डेपोतच टाकला मैला

जतमध्ये कचरा डेपोतच टाकला मैला

जयवंत आदाटे : जत  नगरपालिकेने शौचालयाची टाकी साफ (स्वच्छ) करून टँकरमध्ये भरलेला मैला गावाच्या बाहेर नेऊन त्याची विल्हेवाट लावण्याऐवजी स्मशानभूमीजवळ असलेल्या कचरा डेपोत टाकण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे येथील नागरिकांचे आरोग्य दिवसेंदिवस धोक्यात येऊ लागले आहे.शहराच्या मध्य वस्तीतून जाणाऱ्या विजापूर ते गुहागर राज्य मार्गालगत देवकते कॉलनीलगत हिंदू स्मशानभूमी आहे. या स्मशानभूमीच्या पूर्व बाजूस पालिकेने कचरा डेपो तयार केला आहे. काहीवेळा कचरा रस्त्यालगतच टाकला जातो, तर काहीवेळा हा कचरा पेटवून दिला जातो. त्यातून धुराचे लोट दिवस-रात्र निघत असतात. रस्त्यालगत टाकलेला कचरा रस्त्यावर येतो. काहीवेळा त्यात पावसाचे पाणी जाऊन दुर्गंधी निर्माण होते, तर काहीवेळा धुराचे लोट निघून या परिसरातील नागरिक व बालकांना त्रास सहन करावा लागत आहे. यासंदर्भात येथील नागरिकांनी नगरपालिका प्रशासनाकडे तक्रार केली होती. त्यानंतर हे प्रकार बंद झाले होते.
या घटनेस तीन-चार महिने होत नाहीत, तोपर्यंत नगरपालिका आरोग्य विभागाने शौचालयाची टाकी स्वच्छ करुन त्यातील मैला टँकरमध्ये भरुन ते स्मशानभूमीलगत असलेल्या कचरा डेपोत टाकण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे येथील कचरा व मैला कुजून त्याची दुर्गंधी या परिसरात पसरु लागली आहे. यामुळे या परिसरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात येऊ लागले आहे.
जत शहराची लोकसंख्या सुमारे चाळीस हजार इतकी आहे. शहरातील सर्वच कचरा ट्रॅक्टरद्वारे उचलून तो स्मशानभूमीलगत असलेल्या कचरा डेपोजवळ टाकला जात आहे. या परिसरातच जत शहरातील गटारीचे पाणी नाल्यातून येथे एकत्र जमा होत आहे. त्यामुळे या परिसरात मोकाट जनावरे, डुकरे व कुत्र्यांचा मोठ्या प्रमाणात येथे वावर असतो. रात्री-अपरात्री या रस्त्यावरून चालत जाताना मोकाट कुत्र्याचे कळप फिरत असतात. त्यांचा नागरिकांवर कधीही हल्ला होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

पर्यायी उपाययोजनेची मागणी
जत शहराची लोकसंख्या सुमारे चाळीस हजार इतकी आहे. शहरातील सर्वच कचरा ट्रॅक्टरद्वारे उचलून तो स्मशानभूमीलगत असलेल्या कचरा डेपोजवळ टाकला जात आहे. आरोग्य विभागाने मैलामिश्रित पाणी येथील कचरा डेपोत टाकू नये. त्याची इतरत्र विल्हेवाट लावावी. येथील कचरा डेपो अन्यत्र हलवून स्मशानभूमी परिसरातील दुर्गंधी कमी करावी. या परिसरात जमा होणारे सांडपाण्याची विल्हेवाट लावावी किंवा त्यासंदर्भात पर्यायी उपाय-योजना करावी, अशी येथील नागरिकांची मागणी आहे.

Web Title: The waste in the garbage was scratched

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.