‘म्हैसाळ’मधून हजारो लिटर पाणी वाया

By Admin | Updated: May 19, 2015 00:49 IST2015-05-18T23:09:42+5:302015-05-19T00:49:13+5:30

मुख्य कालव्याला तडे : जमिनी क्षारपड होण्याचा धोका; पाटबंधारे विभागाचे दुर्लक्ष

Wastage thousands of liters of water in 'Mhaysal' | ‘म्हैसाळ’मधून हजारो लिटर पाणी वाया

‘म्हैसाळ’मधून हजारो लिटर पाणी वाया

दिलीप कुंभार- नरवाड --मिरज तालुक्यातील म्हैसाळ प्रकल्पाच्या गळतीने हजारो लिटर पाणी वापराविना पुन्हा नदीत मिसळत असल्याने या प्रकल्पाचे पाणी मृगजळ ठरते की काय? अशी भीती व्यक्त होत आहे.कृष्णा खोरे महामंडळाच्या म्हैसाळ प्रकल्पाची १९८४ मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांनी मुहूर्तमेढ रोवली. अवघ्या ८२ कोटी खर्चाच्या म्हैसाळ प्रकल्पाचा खर्च ९६४ कोटींवर जाऊन पोहोचला. नरवाडच्या वितरण हौदातून मुख्य कालव्याद्वारे ६ टप्पे करून कवठेमहांकाळ व जतला पाणीपुरवठा करण्यासाठी म्हैसाळ प्रकल्पाची महत्त्वाकांक्षी योजना तयार करण्यात आली. वेळोवेळी याच्या चाचणीसाठी आवर्तनेही घेण्यात आली. मात्र १५ ते २० वर्षापूर्वी नरवाडच्या दुसऱ्या टप्प्यातून पाणी वाहण्यासाठी बांधण्यात आलेल्या मुख्य कालव्याची दुरवस्था झाली आहे. याबाबत ‘लोकमत’मधून वेळोवेळी वृत्त प्रसिद्ध झाले होते. पण याबाबत पाटबंधारे खात्याने गांधारीची भूमिका घेतल्याने मुख्य कालव्यातून हजारो लिटर पाणी वापराविना पुन्हा नदीत मिसळत आहे. प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यातून १०१४३ घनमीटर पाणी १५ विद्युत पंपांद्वारे उचलून दुसऱ्या टप्प्याच्या वितरण हौदात सोडले जात आहे. येथूनच मुख्य कालव्याद्वारे पाणी वाहत जाऊन चढावाच्या भागावर पुन्हा पाणी उचलून कवठेमहांकाळला नेले जात आहे. नरवाड, बेडग, लांडगेवाडी, लिंगनूर, सलगरेपर्यंत पाणी विनापाईप जाते. परिणामी बांधकामाच्या निकृष्ट दर्जामुळे नरवाडच्या दुसऱ्या टप्प्यातून बांधकामाचे सिमेंट जीर्ण होऊन मुख्य कालव्यात पडले आहे. जागोजागी घुशींनी आपली राहण्याची जागा केल्याने दगड-माती कालव्यात पडली आहे.यामुळे मोठ्या प्रमाणावर पाणी जमिनीत झिरपून जमिनी क्षारपड होण्याचा धोका वाढला आहे.


ढिसाळ नियोजनाचा फटका -बांधकामाच्या निकृष्ट दर्जामुळे नरवाडच्या दुसऱ्या टप्प्यातून बांधकामाचे सिमेंट जीर्ण होऊन मुख्य कालव्यात पडले आहे. जागोजागी घुशींनी आपली राहण्याची जागा केल्याने दगड-माती कालव्यात पडली आहे. १५ ते २० वर्षापूर्वी नरवाडच्या दुसऱ्या टप्प्यातून पाणी वाहण्यासाठी बांधण्यात आलेल्या मुख्य कालव्याची दुरवस्था झाली आहे. सा. क्र. ९०० येथे कालव्याच्या दुरवस्थेचा नमुना स्थिती पाहण्यास मिळते. मुख्य कालव्याला अनेक ठिकाणी तडे गेले आहेत. अशी वस्तुस्थिती असतानाही पाटबंधारे खात्याने याची कोणतीही खातरजमा केली नसल्याने, अस्तरीकरणाशिवाय पुन्हा प्रकल्प सुरू केल्याने पाटबंधारे खात्यामुळे वाया जाणाऱ्या पाण्याचा बोजवारा नागरिकांच्या अंगावर पडणार आहे. बंद पडलेला हा प्रकल्प सध्या सुरू झाला आहे. टंचाई निधीतून शासनाने पैसे उपलब्ध करून दिले, शिवाय महावितरणच्या सहकार्यामुळे म्हैसाळ पाटबंधारे प्रकल्प सुरू झाला. पण ढिसाळ व्यवस्थापनामुळे तो बंद पडण्याची भीती शेतकऱ्यांतून व्यक्त होत आहे.

Web Title: Wastage thousands of liters of water in 'Mhaysal'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.