दीड हजार रुग्णांवर वाॅररुमची नजर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 31, 2021 04:20 IST2021-05-31T04:20:46+5:302021-05-31T04:20:46+5:30
शीतल पाटील लोकमत न्यूज नेटवर्क सांगली : महापालिका क्षेत्रातील दहा आरोग्य केंद्र, पंधरा कोविड सेंटरसह घरीच उपचार घेणाऱ्या कोरोनाबाधित ...

दीड हजार रुग्णांवर वाॅररुमची नजर
शीतल पाटील
लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : महापालिका क्षेत्रातील दहा आरोग्य केंद्र, पंधरा कोविड सेंटरसह घरीच उपचार घेणाऱ्या कोरोनाबाधित रुग्णांना मदत करण्याचे काम वाॅररुमद्वारे केले जात आहे. होमआयसोलेशनमधील दीड हजार रुग्णांना दोन दिवसांतून एकदा दूरध्वनीवरून संपर्क साधला जात आहे. गेल्या वर्षभरापासून ५० कर्मचारी निरंतरपणे हे काम करीत आहेत.
महापालिका हद्दीत गेल्या वर्षी मार्चमध्ये कोरोनाचा पहिला रुग्ण आढळून आल्यानंतर नागरिकांत भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. आयुक्त नितीन कापडणीस यांनी नागरिकांच्या मदतीसाठी वाॅररुम सुरू करण्याचा निर्णय घेतला. आपटा पोलीस चौकीजवळील महापालिकेच्या आरसीएच कार्यालयात वाॅररुम सुरू झाली. त्यानंतर दुसऱ्या मजल्यावर नव्याने बांधकाम करून प्रशस्त वाॅररुम उभारण्यात आली. संगणक, दूरध्वनी आदी सुविधाही सुरू करण्यात आल्या. राष्ट्रीय शहरी आरोग्य अभियानाकडील कर्मचाऱ्यासह आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली. सहायक आयुक्त पराग कोडगुले यांच्याकडे वाॅररुमची जबाबदारी सोपविली. सुरुवातीला ३० कर्मचारी वाॅररुममध्ये तैनात होते. पहिल्या लाटेत जुलै, ऑगस्ट व सप्टेंबर या तीन महिन्यात शहरात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढली.
आता दुसऱ्या लाटेतही शहरात कोरोनाचा संसर्ग वाढला आहे. दररोज दीडशेहून अधिक रुग्ण सापडत आहेत. त्यातील शंभर ते सव्वाशे रुग्ण होमआयसोलेशनमध्ये असतात. सरासरी दीड हजार रुग्ण सध्या होमआयसोलेशनमध्ये आहेत. या सर्व रुग्णांना औषधाचे किट पोहोचले का, काही समस्या आहेत का, प्रकृती कशी आहे, अशी विचारणा वाॅररुममधून केली जाते. दररोज ७०० ते ८०० दूरध्वनी होतात. पहिल्या लाटेत वाॅररूममधील काहीजण पाॅझिटिव्ह झाले होते. तरीही वाॅररुमचे काम सुरूच होते. आता वर्षभर लोटले तरी वाॅररुममधून कोरोना रुग्णांवर नजर ठेवण्याचे काम सुरूच आहे.
चौकट
कोरोनाबाधितांचा शोध
कोरोना पाॅझिटिव्ह रुग्णांची यादी शासकीय व खासगी रुग्णालयाकडून आल्यानंतर संबंधित रुग्णांचा पत्ता, फोन नंबरचा शोध घेतला जातो. त्यासाठी २० कर्मचारी परिश्रम घेतात. त्यानंतर प्रत्येक आरोग्य केंद्रनिहाय रुग्णांची माहिती कळविली जाते. आरोग्य केंद्राकडील आशा वर्कर्स संबंधित रुग्णांच्या घरापर्यंत पोहोचल्या का, औषधांचे किट दिले का, यावर लक्ष ठेवले जाते.
चौकट
कोरोना रुग्णांचा दैनंदिन अहवाल तयार करणे, मृत्यू, बरे झालेल्या रुग्णांची नोंद ठेवणे, त्याचा तपशील आयुक्त, मंत्रालय, जिल्हाधिकारी कार्यालयासह वरिष्ठांना पाठविणे, बाधित रुग्णांच्या घरी ट्रेसिंग करणे, नॅशनल हेल्थ पोर्टल, आयसीएमआरला माहिती अपलोड करणे आदी विविध पातळीवर वाॅररुममधून काम होते.
चौकट
२४ तास काॅल सेंटर सुरू
महापालिकेच्या वाॅररुममधील काॅल सेंटर २४ तास सुरू असते. त्यासाठी सहा कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली आहे. काॅल सेंटरमधून रुग्णांच्या घरी दूरध्वनी करून चौकशी केली जाते. तसेच बेडची उपलब्धता, रेमडेसिविर व इतर औषधांबाबतही नागरिकांत माहिती दिली जाते. या कामासाठी महापालिकेच्या शिक्षकांनीही योगदान दिले आहे.
चौकट
कोट
महापालिकेच्या वाॅररुममधून कोरोना रुग्णांची यादी घेऊन ट्रेसिंगसाठी पाठविले जाते. होमआयसोलेशनमधील रुग्णांशी संपर्क साधला जातो. त्यांच्या अडचणी जाणून त्या सोडविण्याचा प्रयत्न होतो. रुग्णालये, खासगी लॅबकडून दररोज पाॅझिटिव्ह रुग्णांचा अहवाल घेतला जातो. शासनाच्या विविध पोर्टल, ॲपवर डाटा अपलोड करण्याचे काम केला जाते. त्यासाठी महापालिकेचे २० शिक्षकांसह ५० जण कार्यरत आहेत.
- पराग कोडगुले, सहायक आयुक्त, महापालिका.