मिरजेतील पूरपट्ट्यातील नागरिकांना सतर्कतेच्या सूचना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2021 04:34 IST2021-06-09T04:34:27+5:302021-06-09T04:34:27+5:30
कृष्णा नदीची पाण्याची पातळी वाढण्यापूर्वी नागरिकांनी करावयाच्या उपाययोजनांबाबत महापालिका अग्निशमन दलासह महापालिका कर्मचारी जनजागृती करीत आहेत. दोन वर्षांपूर्वी ...

मिरजेतील पूरपट्ट्यातील नागरिकांना सतर्कतेच्या सूचना
कृष्णा नदीची पाण्याची पातळी वाढण्यापूर्वी नागरिकांनी करावयाच्या उपाययोजनांबाबत महापालिका अग्निशमन दलासह महापालिका कर्मचारी जनजागृती करीत आहेत. दोन वर्षांपूर्वी मिरजेतील कृष्णाघाट व शहरालगत राजीव गांधीनगर, चांद कॉलनी, पिरजादे प्लॉट या विस्तारित भागात महापुराचा फटका बसल्याने मोठे नुकसान झाले होते. यावर्षी पुन्हा चांगल्या पावसाचा अंदाज असल्याने महापुराच्या शक्यतेने महापालिकेने पूरपट्ट्यातील नागरिकांना धोक्याची सूचना दिली आहे. पूरपट्ट्यातील नागरिकांनी कृष्णा नदीच्या पाण्याच्या पातळीत वाढ होण्यास सुरुवात झाल्यास महत्त्वाचे दस्तऐवज, कागदपत्रे, मौल्यवान वस्तू, धान्याचा साठा, पाळीव जनावरे, वाहने सुरक्षित स्थळी हलवावी. पाण्याचा विसर्ग, पूर परिस्थितीबाबतच्या सूचनांकडे लक्ष ठेवावे. प्रशासनाने सूचना दिल्यास आवश्यक साहित्य सोबत घेऊन घर रिकामे करावे. प्रशासनाच्या तात्पुरत्या निवारा केंद्रात स्थलांतरित व्हावे, आदी सूचना देण्यात येत आहेत. कोरोना आपत्तीमुळे हतबल नागरिक आता संभाव्य पुराच्या संकटाचा सामना करण्याची तयारी करीत आहेत.