प्रभाग समित्यांची फोडाफोडी येणार अंगलट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 31, 2021 04:27 IST2021-03-31T04:27:20+5:302021-03-31T04:27:20+5:30
महापालिकेत भाजपची सत्ता आल्यानंतर नव्याने प्रभाग समित्यांची रचना करण्यात आली. जास्तीत जास्त समित्या ताब्यात राहतील, याची दक्षता भाजपने घेतली. ...

प्रभाग समित्यांची फोडाफोडी येणार अंगलट
महापालिकेत भाजपची सत्ता आल्यानंतर नव्याने प्रभाग समित्यांची रचना करण्यात आली. जास्तीत जास्त समित्या ताब्यात राहतील, याची दक्षता भाजपने घेतली. गेली अडीच वर्षे सांगलीतील दोन व मिरजेतील एक अशा तीन समित्या भाजपकडे, तर कुपवाडची प्रभाग समिती काँग्रेस-राष्ट्रवादीकडे आहे. महापौर, उपमहापौर निवडीवेळी भाजपमध्ये फाटाफूट झाली. त्यानंतर महाआघाडीची सत्ता आल्याने आता आघाडीलाही प्रभाग समितीवरील वर्चस्वाची भुरळ पडली आहे. त्यासाठी गेल्या महासभेत पुनर्रचनेचा ठरावही करण्यात आला. आता बुधवारी होणाऱ्या महासभेत त्यावर शिक्कामोर्तब केले जाणार आहे.
मंगळवारी दिवसभर नव्या रचनेबाबत महापौर दिग्विजय सूर्यवंशी, उपमहापौर उमेश पाटील, विरोधी पक्षनेते उत्तम साखळकर, राष्ट्रवादीचे गटनेते मैनुद्दीन बागवान, विष्णू माने, शेडजी मोहिते यांच्यात खलबते सुरू होती. एका प्रभाग समितीत पाच वॉर्डांचा समावेश केला जाणार आहे. जास्तीत जास्त प्रभाग समित्या ताब्यात राहव्यात, यासाठी संख्याबळाचे गणित जुळविण्याची कसरत सुरू होती. त्यातूनही दोन समित्या भाजपकडे, तर दोन समित्यांत आघाडीचे बहुमत होत होते, पण त्यासाठी भाजपच्या फुटीर नगरसेवकांचा टेकू महत्त्वाचा ठरणार आहे. त्यांनी साथ दिली तरच आघाडीला सभापतिपदावर वर्चस्व राखता येणार आहे.
चौकट
संभाव्य प्रभाग समिती रचना
प्रभाग समिती एक : वार्ड ९, १०, ११, १२, १३
प्रभाग समिती दोन : वार्ड १४, ५१, १६, १७, १८
प्रभाग समिती तीन : वार्ड १, २, ३, ८, १९
प्रभाग समिती चार : वार्ड ४, ५, ६, ७, २०