पालिकेसाठी फुटकळ दादाही इच्छुक
By Admin | Updated: October 27, 2015 00:11 IST2015-10-26T23:46:59+5:302015-10-27T00:11:33+5:30
अवैध व्यवसायाचा परिणाम : इस्लामपूर राष्ट्रवादीत बंडाळीचे संकेत

पालिकेसाठी फुटकळ दादाही इच्छुक
अशोक पाटील -- इस्लामपूर--आघाडी शासनाने जिल्ह्यामध्ये मटका बंदी आणली होती. मात्र सध्या खुलेआम मटका सुरू असून, यामध्ये बहुतांशी राजकीय मंडळी आहेत. हा मटका बंद करण्याचा इशारा भाजपचे लोकप्रतिनिधी देत आहेत. यामुळे चोराच्या उलट्या बोंबा सुरू असल्याचे चित्र दिसत आहे. मटका व्यवसायातूनच गल्लीबोळात फुटकळ दादांची गर्दी वाढली आहे. तेच आता आगामी पालिका निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहेत. त्यामुळे राष्ट्रवादीतच बंडाळी होण्याचे संकेत मिळत आहेत.
आगामी पालिका निवडणुकीला अजून दीड वर्षाचा कालावधी आहे. त्यातच प्रभाग रचना बदलली असून, आता छोटे प्रभाग झाले आहेत. त्यामुळे गल्लीबोळात लाख, दीड लाख रुपये खर्च करण्याची ऐपत असणारेही यंदाची पालिका निवडणूक लढवण्याची भाषा करू लागले आहेत. यामध्ये राष्ट्रवादीतीलच बहुतांशी कार्यकर्त्यांचा समावेश आहे. राष्ट्रवादीने उमेदवारी दिली नाही, तर बंडखोरी करून अपक्ष निवडणूक लढवणार असल्याचेही ते बोलत आहेत. ही संख्या वाढत चालल्याने राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांच्यासमोरील डोकेदुखी वाढणार आहे. नुकत्याच झालेल्या बाजार समितीच्या निवडणुकीत राष्ट्रवादीतीलच बाळासाहेब कोरे यांनी बंडखोरी केली. जयंत पाटील यांचा आदेश पाळला नाही. आता पालिकेत प्रत्येक प्रभागातून एकास एक उमेदवारन राहता उमेदवारांची संख्या वाढणार आहे.
मागीलवेळी प्रभागांची संख्या कमी होती. तीन प्रभागांचा एक प्रभाग होता. एका प्रभागात ३ ते ४ उमेदवार निवडून द्यायचे होते. यावेळी मात्र प्रत्येक प्रभागासाठी स्वतंत्र उमेदवार असतील. त्यामुळे निवडणुकीसाठी लागणाऱ्या पैशात बचत होणार आहे. राष्ट्रवादीमध्ये उमेदवाराच्या मुलाखती घेतानाच शैक्षणिक गुणवत्तेऐवजी त्याची आर्थिक परिस्थिती तपासली जाते. त्यामुळे गल्लीबोळात लाख-दोन लाख रुपये खर्च करणाऱ्या कार्यकर्त्यांना आतापासूनच नगरसेवक होण्याची स्वप्ने पडू लागली आहेत.
विरोधक नगण्य : सक्षम नेतृत्वच नाही
इस्लामपूर शहरातील विरोधकांमध्ये ताळमेळ नाही. त्यांच्यामध्ये सक्षम नेतृत्व नाही. त्यामुळे विरोधकांत या पातळीवर स्मशानशांतता आहे. भाजपचे विक्रम पाटील निवडणुकीसाठी कार्यकर्त्यांची जुळवाजुळव करण्याच्या प्रयत्नात आहेत. परंतु त्यांना त्यांच्याच पक्षातील काही पदाधिकाऱ्यांची साथ नसल्याचे निदर्शनास आले आहे.
छोटे व्यावसायिकही इच्छुक
धनदांडगे विद्यमान नगरसेवक स्वत:सह घरातील वारसदारांनाही निवडणुकीच्या रिंगणात उतरविण्याच्या तयारीत आहेत. शहरातील वडापाव, भाजीपाला विक्रेत्यांनाही नगरसेवक होण्याची स्वप्ने पडू लागली आहेत. अशा भाऊगर्दीमुळे निवडणूक तिरंगी, चौरंगी आणि बहुरंगी होणार आहे. एकूणच आगामी निवडणूक लक्षवेधी ठरणार, हे निश्चित.