कोविड ड्यूटीच्या नावाखाली कर्मचाऱ्यांची भटकंती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 19, 2021 04:26 IST2021-05-19T04:26:13+5:302021-05-19T04:26:13+5:30
सांगली : कोविड ड्यूटीच्या नावाखाली महापालिकेचे अनेक कर्मचारी भटकंती करीत असल्याचे प्रकार समोर येत आहेत. काही कर्मचारी तर केवळ ...

कोविड ड्यूटीच्या नावाखाली कर्मचाऱ्यांची भटकंती
सांगली : कोविड ड्यूटीच्या नावाखाली महापालिकेचे अनेक कर्मचारी भटकंती करीत असल्याचे प्रकार समोर येत आहेत. काही कर्मचारी तर केवळ हजेरी लावून दिवसभर घरातच असतात. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केल्याने कर्मचाऱ्यांची मुजोरी सुरू असल्याचा आरोप होऊ लागला आहे.
महापालिकेच्या सर्वच विभागातील कर्मचाऱ्यांवर कोरोना कामाची जबाबदारी टाकण्यात आली आहे. वाॅर्ड संनियंत्रण समित्यापासून ते कोविड केअर सेंटरपर्यंत साऱ्यांच्या ड्यूटी निश्चित केली आहे. कोविड सेंटर वगळता इतर कामासाठी नियुक्त केलेले कर्मचाऱ्यांकडून मात्र कामाबाबत टाळाटाळ केली जात असल्याचे निदर्शनास येत आहे. सकाळी दहा वाजता काही कर्मचारी महापालिकेत येऊन हजेरी लावतात. कार्यालयातील वरिष्ठांना कोविड ड्यूटी असल्याचे सांगून बाहेर पडतात. त्यांच्यावर सोपविलेल्या जबाबदारीच्या ठिकाणी न जाता हे कर्मचारी इतरत्र भटकत असतात अथवा घरी जाऊन बसतात.
सामाजिक कार्यकर्ते आयुब पटेल यांनी नुकतेच एका कर्मचाऱ्याचा प्रताप उघडकीस आणला. हा कर्मचारी गेल्या काही दिवसांपासून कार्यालयात येतच नव्हता. कार्यालयात चौकशी केल्यानंतर तो कोविड ड्यूटीवर असल्याचे सांगितले जात होते. अखेर पटेल यांनी कोविड ड्यूटीच्या ठिकाणी कर्मचाऱ्याबद्दल चौकशी केली असता दहा दिवसांपासून तो तिकडे फिरकला नसल्याचे समजले. त्यांनी विभाग प्रमुखांकडे तक्रार केली. विभागप्रमुखांनीही कर्मचाऱ्याला दूरध्वनी केला; पण तो लागला नाही. याबाबत पटेल यांनी उपायुक्त राहुल रोकडे यांच्याकडेही तक्रार केली आहे. हा प्रकार केवळ एका कर्मचाऱ्यापुरता मर्यादित नाही. असे अनेक कर्मचारी ऑन ड्यूटी भटकंती करीत असल्याचा आरोप होत आहे.