बावचीच्या गल्ल्या नटल्या हिरवाईने
By Admin | Updated: May 22, 2014 00:42 IST2014-05-22T00:29:49+5:302014-05-22T00:42:54+5:30
अनोखा उपक्रम : क्रांती ग्रुपचा पुढाकार

बावचीच्या गल्ल्या नटल्या हिरवाईने
गोटखिंडी : बावची (ता. वाळवा) येथील क्रांती ग्रुपच्या कार्यकर्त्यांनी आगळावेगळा उपक्रम राबविला आहे. अडीच वर्षांपूर्वी ग्रुपच्या वर्धापनदिनी म्हणजे ३१ डिसेंबर २०११ रोजी कार्यकर्त्यांनी गल्ली हिरवीगार करण्याचा उपक्रम हाती घेऊन तडीसही नेला. त्यांनी अंबाबाई देवालयापासून जाधव गल्ली, रकटे गल्लीपर्यंत रस्त्याच्या दुतर्फा अशोकाची झाडे लावून ती जोपासली आहेत. अडीच वर्षांत ती हिरवीगार झाली आहेत. तरुणाई ३१ डिसेंबरला इतर कार्यक्रमात व्यस्त असते, पण हा ग्रुप या झाडांची देखभाल करण्यात व्यस्त असतो. इको-व्हिलेज प्रकल्पाला त्यांनी प्रेरणा दिली आहे. ग्रामपंचायतीनेही गावातून रस्त्याच्या दुतर्फा इको-व्हिलेजअंतर्गत मोठ्या प्रमाणात झाडे लावली आहेत. संपूर्ण गावातून झाडे लावली असून, ती आता मोठी झाल्याने संपूर्ण गाव हिरवाईने नटले आहे. त्यातच भर पडली आहे, ती ग्रामसचिवालयासमोरील कारंजासह चौक सुशोभिकरणाची. झाडांची हिरवाई, कारंजामुळे गावातील चौक शहरांतील चौकांपेक्षा सुशोभित दिसत आहेत. क्रांती गु्रपचे अध्यक्ष अभिजित शिंदे, उपाध्यक्ष अक्षय शिंदे, राहूल शिंदे, दीपक जाधव, बबन शिंदे, विजय जाधव, अमोल पाटील, रणधीर पाटील, संदीप शिंदे, रणजित कोळेकर, संग्राम जाधव, प्रवीण नलवडे, क ष्णात सूर्यवंशी यांच्यासह कार्यकर्ते परिश्रम घेत आहेत. त्यांना ग्रामपंचायतीचीही साथ लाभत आहे. (वार्ताहर)