‘वाकुर्डे’ कुण्या येड्या-गबाळ्याचे काम नव्हे
By Admin | Updated: October 1, 2015 00:32 IST2015-09-30T22:52:25+5:302015-10-01T00:32:09+5:30
शिवाजीराव नाईक : यशवंत समूहाच्या सभेत सत्यजित देशमुख, मानसिंगराव नाईक यांच्यावर टीका

‘वाकुर्डे’ कुण्या येड्या-गबाळ्याचे काम नव्हे
कोकरूड : नाकर्तेपणामुळेच जनतेने तुम्हाला नाकारले आहे, असा टोला सत्यजित देशमुख यांचे नाव न घेता आमदार शिवाजीराव नाईक यांनी लगावला. त्याचबरोबर वाकुर्डे बु. योजनेचा प्रारंभ युतीच्या काळात झाला व त्या कामाची पूर्तताही युती शासनाच्या काळातच होणार आहे. हे कुण्या येड्या-गबाळ्याचे काम नाही, असा उपरोधिक टोलाही त्यांनी मानसिंगराव नाईक यांचे नाव न घेता लगावला.शिराळा येथे यशवंत उद्योग समूहातील यशवंत ग्लुकोज, शिवाजी केन प्रकल्प, यशवंत दूध संघ व वारणा-मोरणा भाजीपाला संघ आदी संस्थांच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत ते बोलत होते. यावेळी जि. प. सदस्य रणधीर नाईक, ग्लुकोजचे उपाध्यक्ष नामदेव पाटील, सत्यजित नाईक, पी. ई. गिरासे आदी प्रमुख उपस्थित होते.
आमदार नाईक म्हणाले की, आपण मतदार संघाच्या शेती व पिण्याच्या पाण्यासाठी वरदायी असणारी वाकुर्डे बु. योजना कोणत्याही परिस्थितीत पूर्ण करणार असून, या योजनेतून मानकरवाडी, मोरणा, रेठरेधरण व कार्वे तलाव बारमाही भरणार आहेत. त्याबरोबरच कासेगाव पोलीस स्टेशनला शिराळा तालुक्यातील जोडलेली १० गावे कोणत्याही परिस्थितीत शिराळा पोलीस स्टेशनला जोडणार आहे. याबाबतचा पोलीस अधीक्षकांचा अहवाल गृह खात्याकडे गेला आहे. विरोधक आमच्यावर टीका करताना वस्तुस्थितीचे कोणतेही भान न ठेवता बेभानपणे आरोप करीत आहेत. जे गेल्या निवडणुकीत ३ क्रमांकावर गेले, ज्यांच्या व माझ्या मतांमध्ये ४० हजारहून अधिक मतांचा फरक आहे, त्यांना माझ्यावर बोलण्याचा नैतिक अधिकार नाही. मी गेल्या वर्षभराच्या कालावधित पेठ एम. आय. डी. सी. रद्द करून घेतली. चांदोली पर्यटन विकासासाठी ठोस पावले उचलली आहेत. येत्या दोन वर्षात ‘वाकुर्डे’ मार्गी लावणार आहे.
रणधीर नाईक म्हणाले की, यशवंत ग्लुकोजने आपल्या उत्पादनाची क्षमता वाढविण्याचे काम हाती घेतले असून ८७ कोटीची उलाढाल, काजू प्रक्रिया उद्योगाची ३३ लाख उलाढाल असून वीज प्रकल्पाद्वारे सव्वादोन कोटीची निर्मिती झाली आहे, तर दूध संघाच्या माध्यमातून संघाचे १ लाख लिटर दूध संकलन त्यात ११ टक्क्यांची वाढ झाली आहे. शिवाजी केनचे १४ हजार सभासद असून तो १० महिन्यात कार्यान्वित झाला असून गतवर्षी १ लाखाचे गाळप झाले.
यावेळी यशवंत दूधचे सत्यजित नाईक, अभिजित नाईक, शहाजी पाटील, सी. एच. पाटील, प्रल्हाद पाटील, एस. व्ही, पाटील, दत्ता आंदळकर गजानन पाटील, वसंत पाटील, विकास देशमुख, दिलीप कदम, उत्तम निकम, महेश पाटील, विजय पाटील, संदीप पाटील, महेश पाटील, उत्तम पाटील, सुहास कदम, युवराज यादव, प्रशांत पाटील, बी. टी. पाटील, संजय घोरपडे, विकास पाटील, के. वाय. भाष्टे उपस्थित होते.
सुखदेव पाटील यांनी स्वागत केले. यावेळी गुणवंत कामगारांचा सत्कार व उद्योग समूहाच्यावतीने आमदार शिवाजीराव नाईक यांचा सत्कार करण्यात आला. नामदेव पाटील यांनी आभार मानले. (वार्ताहर)