कृषी चिकित्सालयाची पलूसकरांना प्रतीक्षा

By Admin | Updated: July 25, 2014 23:36 IST2014-07-25T23:05:45+5:302014-07-25T23:36:56+5:30

जागाच नाही : २५ एकर जमिनीची आवश्यकता

Waiting for the peters of the Agricultural College | कृषी चिकित्सालयाची पलूसकरांना प्रतीक्षा

कृषी चिकित्सालयाची पलूसकरांना प्रतीक्षा

आर. एन. बुरांडे ल्ल पलूस - कृष्णा आणि वेरळा नद्यांच्या कुशीतील पलूस तालुक्यातील बहुतांश शेतीक्षेत्र बागायती आहे. मात्र तालुक्यात जागाच उपलब्ध होत नसल्याने शेतकऱ्यांना आवश्यक कृषी चिकित्सालय अद्याप सुरू झालेले नाही.
पलूस तालुक्याची निर्मिती १५ वर्षांपूर्वी झाली. त्यानंतर तालुक्यासाठी आवश्यक पोलीस ठाणे, मध्यवर्ती शासकीय इमारत, तहसील कार्यालय, न्यायालय, पंचायत समिती, शासकीय गोदाम, शासकीय अधिकाऱ्यांची निवासस्थाने, पलूस एसटी आगार यासाठी जागा उपलब्ध झाल्या आणि सुसज्ज इमारतीसुध्दा उभारण्यात आल्या, परंतु शेती विकासासाठी आजअखेर कृषी चिकित्सालयासाठी जागाच उपलब्ध होत नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे कृषी चिकित्सालय सुरू झालेले नाही.
तालुक्यात सुमारे १२ हजार हेक्टर क्षेत्र बागायती असल्याने आणि सिंचनाचे जाळे सर्वत्र पसरल्याने येथील शेतकरी नवनवीन प्रयोग करीत असतात. निर्यातक्षम द्राक्षे, विविध प्रकारची फुले, फळभाज्या, भाजीपाला, केळी, हळद आदी पिके मोठ्या प्रमाणात घेतली जातात. हरितगृहांची संख्यासुध्दा मोठी आहे.
पलूस तालुका कृषी चिकित्सालयासाठी २५ एकर जमिनीची आवश्यकता आहे. कृषी चिकित्सालयात सुधारित कलमे, रोपे तयार करणे, नवनवीन जाती विकसित करून त्यांचे प्रात्यक्षिकाच्या माध्यमातून मार्गदर्शन करणे, जैविक खतांच्या निर्मितीचे तंत्रज्ञान देणे, शेती औषधांची योग्यता चाचपणी प्रयोगशाळा यामधून शेतकऱ्यांना आधुनिक शेती तंत्रज्ञानाचे मार्गदर्शन करणे सोयीचे होणार आहे. पारंपरिक शेती न करता नवीन तंत्रज्ञानाने कसदार पिकांची निर्मिती होऊन भरघोस उत्पादन घेता येणार आहे. यामुळे औषधांमधून आणि खतांमधून शेतकऱ्यांच्या होणाऱ्या फसवणुकीस आळा बसणार आहे.
तालुक्यातील घोगाव, बुर्ली, नागराळे, पुणदी, पुणदीवाडी, दह्यारी, तुपारी, दुधोंडी, पलूस, सावंतपूर, कुंडल, गोंदीलवाडी, विठ्ठलवाडी, आमणापूर, अनुगडेवाडी, संतगाव, सूर्यगाव, नागठाणे, तावदरवाडी, बुरूंगवाडी, अंकलखोप, खंडोबाचीवाडी, माळवाडी, हजारवाडी, भिलवडी, वसगडे, चोपडेवाडी, खटाव, सुखवाडी, ब्रह्मनाळ या परिसरात ऊस, सोयाबीन, हळद, केळी, भाजीपाला, फळभाज्या या पिकांसाठी ठिंबक सिंचन, टिश्यू कल्चर असे प्रयोग सुरू आहेत. जर कृषी चिकित्सालयामार्फत या शेतकऱ्यांना आधुनिक शेती तंत्रज्ञान उपलब्ध झाले, तर ते फायदेशीर ठरणार आहे.
पलूस तालुक्याच्या कृषी कार्यालयासाठी मध्यवर्ती शासकीय इमारतीमध्ये स्वतंत्र जागा मिळाली आहे. चिकित्सालयाला वन विभागातील २५ एकर जागा दिल्यास पलूस तालुका शेतीक्षेत्रात आघाडीवर राहणार आहे.

कृषी चिकित्सालयात सुधारित कलमे, रोपे तयार करणे, नवनवीन जाती विकसित करून त्यांचे प्रात्यक्षिकाच्या माध्यमातून मार्गदर्शन करणे, जैविक खतांच्या निर्मितीचे तंत्रज्ञान देणे, शेती औषधांची योग्यता चाचपणी प्रयोगशाळा यामधून शेतकऱ्यांना आधुनिक शेती तंत्रज्ञानाचे मार्गदर्शन करणे सोयीचे होणार आहे. पारंपरिक शेती न करता नवीन तंत्रज्ञानाने कसदार पिकांची निर्मिती होऊन भरघोस उत्पादन घेता येणार आहे. यामुळे औषधांमधून आणि खतांमधून शेतकऱ्यांच्या होणाऱ्या फसवणुकीस आळा बसणार आहे.

Web Title: Waiting for the peters of the Agricultural College

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.