जिल्ह्यातील ३०० अंध ‘दृष्टी’च्या प्रतीक्षेत...
By Admin | Updated: September 7, 2014 23:23 IST2014-09-07T21:58:07+5:302014-09-07T23:23:36+5:30
नेत्रदान पंधरवडा : जनजागृती करण्याची आवश्यकता

जिल्ह्यातील ३०० अंध ‘दृष्टी’च्या प्रतीक्षेत...
नरेंद्र रानडे - सांगली --आपल्याला डोळे असल्याने आपण सृष्टीतील नानाविध घडामोडी पाहू शकतो. परंतु ज्यांना डोळेच नाहीत, त्याचे काय? धावपळीच्या जीवनात आपण त्यांचा कधी विचारही करीत नाही. नेत्रदानाची आपली एक छोटीशी कृतीही अंधांना दृष्टी देऊ शकते. परंतु दुर्दैवाने जुन्या परंपरांचा पगडा अद्यापही कित्येक जणांवर असल्याने नेत्रदानाचे प्रमाण वाढत नाही. सुमारे २८ लाखांची ‘डोळस’ लोकसंख्या असलेल्या सांगली जिल्ह्यात ३०० ‘अंध’ व्यक्ती डोळ्यांची प्रतीक्षा करीत आहेत. वास्तविक जिल्ह्यात नेत्रदानाचे प्रमाण वाढले, तर ३०० अंधांना दृष्टी मिळणे यात अवघड काही नाही. जिल्ह्यात सहा दृष्टिदान बॅँका असूनही नागरिकांचा दृष्टिदानाकडे फारसा ओढा नसल्याचे विदारक चित्र आहे.
भारतातील डोळ्यांचे प्रसिध्द डॉक्टर आर. ए. भालचंद्र यांनी त्यांच्या कार्यकालात एक लाख अंधांना नेत्ररोपण करून दृष्टी प्रदान केली. शासनाकडून, चित्रपटसृष्टीतील अभिनेत्रींचा आधार घेऊन ‘नेत्रदान श्रेष्ठदान’ हा संकल्प सर्वसामान्यांच्या मनात बिंबविण्याकरिता प्रयत्न केला जातो. सामान्य नागरिक उत्साहात नेत्रदानाचे संकल्पपत्र भरून नेत्रपेढींना देतो. परंतु संबंधित व्यक्तीचे निधन झाल्यावर त्याच्या कुटुंबातील सदस्य नेत्रदानासाठी आग्रही नसतात अथवा दुर्लक्ष करतात. परिणामी नेत्रदानाचे संकल्प हजारो आणि नेत्रदान मात्र हाताच्या बोटावर मोजता येईल एवढेच, अशी स्थिती दिसते. ही परिस्थिती बदलणे आपल्याच हातात आहे. सामाजिक संघटनांनी तसेच जागरुक नागरिकांनीही नेत्रदानाविषयी जनजागृती करणे अत्यावश्यक आहे. आपल्या संस्कृतीत ‘दान’ या शब्दाला महत्त्वाचे स्थान आहे. आपण या सुंदर जगात नसतानाही एखादी अंध व्यक्ती आपल्या डोळ्यांनी जग पाहू शकत असेल, तर त्याला मदत करणे आपले कर्तव्यच आहे. हा विचार जनमानसात रुजविला पाहिजे. देशाचा विचार केला, तर सध्या १० लाख लोकांना दृष्टीची गरज आहे. दिवसेंदिवस या प्रमाणात वाढच होत आहे. दरवर्षी देशात सुमारे एक कोटी लोक मृत्यू पावतात. परंतु देशभरातील ७०० नेत्रपेढींना प्रतिवर्षी केवळ ४२,००० डोळेच मिळू शकतात.
सांगली जिल्ह्यातील अंध लोकांच्या यादीचा अभ्यास केला, तर कित्येक तरुण व्यक्ती अंधत्वाच्या शिकार झाल्याचे दिसते. साहजीकच त्यांना तरुण डोळ्यांची गरज असते. अपघातांचे वाढते प्रमाण पाहता, अपघातात मृत झालेल्या तरुणांच्या कुटुंबांचे समुपदेशन करून त्यांचे डोळे दान केले गेले, तर त्याचा निश्चित लाभ अंध तरुणांना होऊ शकेल.
हे महत्त्वाचे कार्य सांगलीच्या शासकीय रुग्णालयातील जिल्हा नेत्रदान समुपदेशक डॉ. अविनाश शिंदे हे मागील तीन वर्षांपासून करीत आहेत. मागीलवर्षी त्यांनी शासकीय रुग्णालयात मृत पावलेल्या व्यक्तींच्या कुटुंबांना नेत्रदानाचे महत्त्व पटवून सांगून १५० डोळे नेत्रपेढीकडे सुपूर्द केले आहेत. २०१३ - २०१४ या वर्षात जिल्ह्यातील नेत्रपेढीत ४२९ डोळे जमा झाले आहेत. परंतु जमा झालेल्या सर्व डोळ्यांचा वापर नेत्रदानासाठी करता येत नसल्याने अद्यापही ३०० अंध दृष्टीच्या प्रतीक्षेत आहेत.
नेत्रदान म्हणजे काय?
मृत्यूनंतर ४ ते ६ तासांच्या कालावधित मृत व्यक्तीचे डोळे नेत्रतज्ज्ञांकडून नेत्रपेढीत जमा करता येतात.
याकरिता कुटुंबातील सदस्याच्या मृत्यूनंतर त्वरित नेत्रपेढीशी संपर्क साधा
मृत व्यक्तीची संमती नसल्यासही नातेवाईकांच्या संमतीचे नेत्रदान करता येते.
नेत्रदान केल्याने मृत व्यक्तीचा चेहरा विद्रुप होत नाही.
मृत व्यक्तीचे डोळे बंद करून त्यावर कापूस व बर्फ ठेवा.
खोलीतील पंखा बंद ठेवा.
नेत्रदान केलेले डोळे कधीच विकले जात नाहीत.