प्रतीक्षा संपली... १७ केंद्रांवर १६ जानेवारीपासून लसीकरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 05:09 IST2021-01-13T05:09:57+5:302021-01-13T05:09:57+5:30

लाेकमत न्यूज नेटवर्क सांगली : जिल्ह्यात कोरोनाच्या लसीकरण मोहिमेस येत्या १६ जानेवारीनंतर सुरुवात होणार आहे. त्याची तयारी पूर्ण झाली ...

The wait is over ... Vaccination at 17 centers from 16th January | प्रतीक्षा संपली... १७ केंद्रांवर १६ जानेवारीपासून लसीकरण

प्रतीक्षा संपली... १७ केंद्रांवर १६ जानेवारीपासून लसीकरण

लाेकमत न्यूज नेटवर्क

सांगली : जिल्ह्यात कोरोनाच्या लसीकरण मोहिमेस येत्या १६ जानेवारीनंतर सुरुवात होणार आहे. त्याची तयारी पूर्ण झाली असून, येत्या दोन दिवसांत लस मिळण्याची शक्यता आहे. जिल्ह्यात एकूण १७ केंद्रांवर ही लसीकरण मोहीम चालणार आहे.

जिल्ह्यातील ग्रामीण भागात ९ ठिकाणी व महापालिका क्षेत्रात ८ ठिकाणी लसीकरण केंद्र स्थापन केले आहे. अद्याप जिल्ह्याला लसी प्राप्त झालेल्या नसून, त्या दोन दिवसांत प्राप्त होण्याची शक्यता आहे. लसीकरणाची रंगीत तालीम नुकतीच झाली आहे. संबंधित केंद्रांवर डॉक्टर व कर्मचारी नियुक्त केले आहेत. त्यांच्यावर लसीकरणाची जबाबदारी दिली आहे. एका केंद्रावर एका दिवसात जास्तीत जास्त १०० जणांना लस दिली जाणार आहे. आरोग्य यंत्रणेने याबाबतची तयारी पूर्ण केली आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी सोमवारी याबाबतचा आढावा घेतला आहे. सुरुवातीला नोंदणीकृत आरोग्य कर्मचाऱ्यांना लस दिली जाणार आहे.

कोणत्या बूथवर दिली जाणार लस

ग्रामीण भागात कवठेमहांकाळ, इस्लामपूर, आटपाडी, तासगाव, पलूस, कडेगाव येथील ग्रामीण रुग्णालयांमध्ये लस दिली जाणार आहे. चिंचणी (ता. तासगाव), कुरळप (ता. वाळवा) आणि कवलापूर (ता. मिरज) येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातही लसीकरण होणार आहे. महापालिका क्षेत्रात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, मिरज व सांगली शासकीय रुग्णालये, भारती विद्यापीठ येथे लसीकरण केंद्र उभारण्यात आले आहे.

लसीकरण कोणाला व कधी?

जिल्ह्यातील नोंदणी केलेल्या २५ हजार आरोग्य कर्मचाऱ्यांना सुरुवातीला लस दिली जाणार आहे. त्यांना त्यासंदर्भातील संदेश मोबाइलवर प्राप्त होईल. जसा लसीचा साठा प्राप्त होतील, त्यानुसार प्राधान्यक्रमाने वेगवेगळ्या घटकांसाठी लसीकरण केले जाणार आहे.

दररोज होणार लसीकरण

जिल्ह्यात दि. १६ पासून लसीकरण सुरू होणार आहे. एका दिवसानंतर मोहीम थांबणार नाही. लसी मिळत राहतील त्याप्रमाणात केंद्रसंख्या वाढवून ही मोहीम सुरू ठेवली जाणार आहे, असे जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी यांनी सांगितले.

लसीकरणाची सर्व तयारी पूर्ण झाली आहे. १७ ठिकाणी बूथ स्थापन केले आहेत. जिल्ह्याला किती लस सध्या मिळणार आहेत, याची कल्पना नाही. एका बूथवर दिवसात कमाल १०० लसीकरण केले जाईल.

- डॉ. मिलिंद पोरे,

जिल्हा आरोग्य अधिकारी, सांगली

Web Title: The wait is over ... Vaccination at 17 centers from 16th January

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.