कळंबीजवळ वडाप जीप-टेम्पोचा अपघात
By Admin | Updated: April 26, 2015 01:07 IST2015-04-26T01:05:43+5:302015-04-26T01:07:26+5:30
तिघे गंभीर : चालकासह ११ जखमी; महिला, बालकांचा समावेश, स्पर्धेचा परिणाम

कळंबीजवळ वडाप जीप-टेम्पोचा अपघात
मिरज : मिरज-पंढरपूर रस्त्यावर शनिवारी कळंबीजवळ वडाप जीप व टेम्पोची धडक होऊन जीपचालकासह ११ जण जखमी झाले. जखमींमध्ये सात महिला व एका बालकाचा समावेश असून यातील तिघांची प्रकृती गंभीर आहे.
दुपारी कळंबीजवळ मिरजेकडे जाणारा टेम्पो (क्र. एमएच ३० ए.बी. २४३०) व सोनीतून मिरजेकडे जाणारी वडाप जीप (क्र. एमएच १० के. २२४) ही दोन्ही वाहने एकाच दिशेने जात असताना परस्पराना ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात दोन्ही वाहनांची धडक झाली. या दोन्ही भरधाव वाहनांच्या धडकेने मोठा आवाज होऊन जीपचा चक्काचूर झाला. जीपमधील महिला व बालकांसह सर्व ११ जण जखमी झाले. जखमींना मिरजेच्या शासकीय रूग्णालय व मिशन रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. जखमींची नावे पुढीलप्रमाणे : दिगंबर मारूती पवार (वय २६, रा. वाळेखिंडी), अमित येडुरे (३२, रा. इचलकरंजी), समर्थ मधुकर वावरे (६), सविता मधुकर वावरे (३५, रा. सांगली), प्रभावती बाळासाहेब माने (३६, रा. गणेशवाडी), हौसाबाई मारूती नदोरे (५४, रा. धनगर गल्ली मिरज), प्रियांका बाळासाहेब नरोटे (१५), वहिदा हमजू मुलाणी (४५), जीपचालक अल्ताफ हुसेन मुलाणी (३०, रा. सोनी), नगमा मुजावर (४०, धुळगाव), पार्वती राजाराम बेडगे (५७, रा. रायवाडी, ता. कवठेमहांकाळ).
जखमींपैकी तिघांची प्रकृती गंभीर असून त्यांना मिशन रूग्णालयात अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले आहे. वडाप वाहनाचा चालक दुसऱ्या वडाप वाहनाच्या अगोदर मिरजेला पोहोचण्यासाठी भरधाव वेगात जात असताना हा अपघात घडल्याची चर्चा होती. (वार्ताहर)