राज्याच्या राज्यपालपदी विक्षिप्त माणूस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2021 04:48 IST2021-02-06T04:48:00+5:302021-02-06T04:48:00+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क जत : जतला कृषी महाविद्यालय होण्यासाठी राज्य शासनाकडून कोणतीही अडचण नाही. परंतु राज्याच्या राज्यपालपदी विक्षिप्त माणूस ...

राज्याच्या राज्यपालपदी विक्षिप्त माणूस
लोकमत न्यूज नेटवर्क
जत : जतला कृषी महाविद्यालय होण्यासाठी राज्य शासनाकडून कोणतीही अडचण नाही. परंतु राज्याच्या राज्यपालपदी विक्षिप्त माणूस बसला आहे. राज्यपाल भगतसिंह कोश्यारीच कृषी महाविद्यालयाला मान्यता देण्यात अडथळा आणत आहेत, अशी टीका महिला व बालविकास मंत्री यशोमती ठाकूर यांनी केली.
जत येथे आमदार विक्रम सावंत यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित ‘माळरान कृषी प्रदर्शना’चे उद्घाटन व कृषी सन्मान सोहळ्यात त्या बोलत होत्या. कृषीमंत्री दादा भुसे, कृषी राज्यमंत्री विश्वजित कदम, आ. विक्रम सावंत यांची प्रमुख उपस्थिती होती.
यशोमती ठाकूर म्हणाल्या की, जतच्या शेजारी धोका देणाऱ्यांचे राज्य आहे; परंतु जत तालुक्यात पाणी आणल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही. कर्नाटकातून प्रायोगिक तत्त्वावर पाणी आणूच. आमचे कोण ऐकत नाही, ते बघून घेऊ. जत तालुका आम्ही दत्तक घेतला आहे. जे मागाल त्याची पूर्तता करण्यासाठी वचनबद्ध आहोत.
दादा भुसे म्हणाले की, राज्यात कोणत्याही तालुक्यात दुष्काळी परिस्थिती राहणार नाही, असा शासनाचा निर्धार आहे. बाजारात मागणी असेल तेच पीक शेतकऱ्यांनी घ्यावे. त्यानंतर त्यांना इतरांच्या कुबड्या व कर्ज घेणे आणि कर्जमाफीची गरज लागणार नाही.
विश्वजित कदम म्हणाले की, पाणी आल्यानंतर जत तालुक्याच्या विकासाचा अनुशेष भरून निघेल.
आ. सावंत म्हणाले की, जतला सहजासहजी जेथून पाणी येईल, तेथून मिळावे, यासाठी शासनदरबारी पाठपुरावा सुरू आहे. म्हैसाळ जलसिंचन योजनेमुळे फक्त १० ते ११ टक्के क्षेत्र ओलिताखाली आले आहे. पूर्वभागातील ५२ गावे पाण्यापासून अद्याप वंचित आहेत. विस्तारित योजनेमुळे आणखी दहा-पंधरा वर्षे वाया जाणार आहेत. तसे होऊ नये, यासाठी जेथून पाणी देता येईल, तेथून द्यावे, अशी शासनाला विनंती आहे. पावसाळ्यात साठवण तलाव भरून दिले, तर उन्हाळ्यात येथील पाणीटंचाईला तोंड द्यावे लागणार नाही. जत तालुक्याच्या विभाजनाऐवजी त्रिभाजन करून गैरसोय कमी करावी.
काँग्रेसचे तालुकाध्यक्ष अप्पू बिराजदार यांनी प्रास्ताविक केले. यावेळी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संजय विभुते, बाबासाहेब कोडग, जतच्या नगराध्यक्षा शुभांगी बन्नेनवार, मीनल सावंत, मारुती पवार, ॲड. युवराज निकम, गणेश गिड्डे उपस्थित होते. इराण्णा निडोणी यांनी आभार मानले.
चौकट
‘लग्न एकाशी आणि संसार दुसऱ्याशी’
राज्यात शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीची महाविकास आघाडी असली, तरी जत तालुक्यातील मित्रपक्ष ‘लग्न एकाशी आणि संसार दुसऱ्याशी’ करत आहे, असा टोला कृषी राज्यमंत्री विश्वजित कदम यांनी राष्ट्रवादी पक्षाचे नाव न घेता लगावला.