पुरग्रस्तांना मदतीच्या वल्गना; खात्यावर अद्याप भोपळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 17, 2021 04:31 IST2021-09-17T04:31:01+5:302021-09-17T04:31:01+5:30
दूधगाव : मिरज पश्चिम भागात २०१९ व २०२१ असा दोन वेळा महापुराने प्रचंड फटका बसला आहे. घरे, शेती, पशुधन, ...

पुरग्रस्तांना मदतीच्या वल्गना; खात्यावर अद्याप भोपळा
दूधगाव : मिरज पश्चिम भागात २०१९ व २०२१ असा दोन वेळा महापुराने प्रचंड फटका बसला आहे. घरे, शेती, पशुधन, व्यवसाय आदींचे नुकसान झाल्याने आर्थिक घडी विस्कटली आहे. या भागातील दूधगाव, कसबे डिग्रज, माेजे डिग्रजसह अनेक पूरग्रस्त गावांमध्ये ही अवस्था पाहायला मिळत आहे.
या भागात मुख्यमंत्र्यांपासून खासदार, आमदार व अनेक स्वयंघोषित नेत्यांनी पूर ओसरल्यावर भेटी दिल्या. तातडीच्या मदतीच्या घोषणा केल्या.
पूरग्रस्त कुटुंबाला १० हजार रुपयांची तातडीची मदत, व्यावसायिकांना किमान ५० हजार रुपयांची मदत व पिकाची नुकसानभरपाई येईल म्हणून शासनाच्या मदतीची प्रतीक्षा करणाऱ्या पूरग्रस्तांच्या खात्यावर महापुरानंतर दोन महिने लोटले तरी एक रुपयाही जमा झाला नाही.
दरम्यान, काही गावांमध्ये मदतीची रक्कम मिळाल्याचे सांगितले जात आहे; मग अद्याप या मदतीपासून वंचित असणाऱ्यांना कधी पैसे मिळणार? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
चाैकट
आंदोलनाचा इशारा
कसबे डिग्रजसारख्या पूर्णपणे कृष्णा नदीच्या पाण्याखाली गेलेल्या तालुक्यात लोकसंख्येने मोठ्या असलेल्या गावात कोणालाही मदत मिळाली नाही. यामुळे गावातील युवक अरुण पवार यांनी संबंधित खात्याला निवेदन देऊन पूरग्रस्तांना त्वरित मदत देण्याची मागणी केली आहे. या मागणीस अनकूल प्रतिसाद न मिळाल्यास सांगली-इस्लामपूर मार्गावर हजारो पूरग्रस्तांसह रास्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा त्यांनी दिला आहे.