मतदारांनी नाना, बापू, दाजी आणि आप्पांना दिली विश्रांती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 07:32 IST2021-02-05T07:32:16+5:302021-02-05T07:32:16+5:30
सांगली : जिल्ह्यात नुकत्याच संपलेल्या ग्रामपंचायत निवडणुकांत तरुण उमेदवारांनी ज्येष्ठांना फक्त सल्ल्यापुरते ठेवल्याचे स्पष्ट झाले आहे. १४३ ग्रामपंचायतींत फक्त ...

मतदारांनी नाना, बापू, दाजी आणि आप्पांना दिली विश्रांती
सांगली : जिल्ह्यात नुकत्याच संपलेल्या ग्रामपंचायत निवडणुकांत तरुण उमेदवारांनी ज्येष्ठांना फक्त सल्ल्यापुरते ठेवल्याचे स्पष्ट झाले आहे. १४३ ग्रामपंचायतींत फक्त ६५ ज्येष्ठ नागरिक सदस्य म्हणून निवडून आले आहेत. तुलनेने तरुणांची संख्या २५० हून अधिक आहे.
प्रत्येक गावात पॅनलप्रमुखांनी काही ज्येष्ठांना उमेदवारी दिली होती; पण त्यांतील ६५ जणच निवडून येऊ शकले. वास्तविक ज्येष्ठ सदस्य अनुभवसंपन्न असल्याने गावगाडा चालविताना त्यांच्या सल्ल्यांचा उपयोग होतो. विकासाचा रथ चुकीच्या मार्गाने निघाला असेल तर अनुभवी सदस्य वेसण रोखून धरतात. येत्या पाच वर्षांत मात्र त्यांची उणीव भासेल.
एकूण १२९ ज्येष्ठ नागरिक निवडणुकीच्या मैदानात उतरले होते; पण सर्वांनाच विजयाच्या शिखरापर्यंत पोहोचता आले नाही. जत आणि तासगाव तालुक्यांत विजयी उमेदवारांचे प्रमाण सर्वाधिक आहे. वाळवा व शिराळा तालुक्यांत दोन-चार ग्रामपंचायतींच्याच निवडणुका होत्या; त्यामुळे तेथे अत्यल्प संख्या दिसते. कडेगाव, खानापूर, मिरज, कवठेमहांकाळ, पलूस, आटपाडीमध्येही दादा, बापू, नाना, आप्पा ही ज्येष्ठ मंडळी रिंगणात उतरली होती; पण मतदारांनी त्यांना नाकारले.
चौकट
जतमध्ये सर्वाधिक अनुभवसंपन्न कारभारी
जत तालुक्यात ३८ ज्येष्ठांनी ग्रामपंचायतीचे मैदान लढविले; पण मतदारांनी सर्वांना स्वीकारले नाही. त्यातील २३ जणांनाच विजयश्रीने माळ घातली. तासगाव तालुक्यात ३९ ज्येष्ठांनी गावकारभारी होण्याचे स्वप्न पाहिले; पण तेथे तरुणांनी बाजी मारली. १५ जणांनाच ग्रामपंचायतीचा उंबरठा ओलांडता आला.
पॉईंटर्स
- निवडणुका झालेल्या ग्रामपंचायती - १४३
- निवडून आलेले उमेदवार - १५०८
- विजयी ज्येष्ठ नागरिक - ६५
कोट
तरुणांनी ज्येष्ठांच्या अनुभवांचा फायदा गावच्या विकासकामांसाठी करून घ्यायला हवा. जुन्या आणि नव्यांची सांगड घालून कामकाज केल्यास गावाला नवी दिशा मिळेल.
- बाळकृष्ण पाटील, नवनिर्वाचित सदस्य
कोट
यापूर्वी ग्रामपंचायतीत काम केलेले असल्याने विकासकामांची नेमकी दिशा माहिती आहे. त्याचा फायदा ग्रामपंचायतीला नव्याने करून देऊ. नेहमी विकासाचे समाजकारण केल्याने मतदारांनी पाठींबा दिला.
- रामदेव भंडारे, नवनिर्वाचित सदस्य
कोट
महिलांचे प्रश्न सोडविण्यासाठी ग्रामपंचायतीत प्रयत्न करीन. तरुण सदस्यांनाही माझ्या सल्ल्यांचा फायदा होईल असे वाटते. मिळालेल्या संधीचे चीज करुन व नव्या पिढीशी जमवून घेऊन गावचा कारभार करणार आहे.
- भारती दरुरे, नवनिर्वाचित सदस्या
-----------