विठ्ठलदेव सोसायटीसाठी काट्याची लढत

By Admin | Updated: February 23, 2015 23:57 IST2015-02-23T23:39:36+5:302015-02-23T23:57:45+5:30

भाजप-कॉँग्रेस आमने-सामने : वांगीतील राजकीय वातावरण तापले

For the Vitthaldev Society, fight for the thorns | विठ्ठलदेव सोसायटीसाठी काट्याची लढत

विठ्ठलदेव सोसायटीसाठी काट्याची लढत

मोहन मोहिते -वांगी  कडेगाव तालुक्यात सर्वात मोठ्या समजल्या जाणाऱ्या वांगी येथील श्री विठ्ठलदेव सर्व सेवा सहकारी सोसायटीची पंचवार्षिक निवडणूक दुरंगी होत असून, कॉँग्रेस विरुध्द भाजप असा थेट सामना होत आहे. या पार्श्वभूमीवर तालुक्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले असून, दोन्ही गटांनी थेट मतदारांशी संपर्क साधून सत्ता काबीज करण्यासाठी फिल्डिंग लावली आहे. त्यामुळे या संस्थेच्या निवडणुकीकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे.
वांगी येथील श्री विठ्ठलदेव सोसायटीच्या १३ जागांसाठी १ मार्च रोजी निवडणूक होणार असून २७ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. दोन्ही गटातून प्रामुख्याने तरुणांना संधी देण्यात आली आहे. ही निवडणूक ज्येष्ठ नेते मोहनराव कदम यांच्या नेतृत्वाखालील कॉँग्रेस विरुध्द माजी आ. पृथ्वीराज देशमुख यांच्या नेतृत्वाखालील भाजपमध्ये होत आहे. उमेदवारी अर्ज दाखल करतेवेळी कॉँग्रेसमध्येच दोन गट निर्माण झाले. परंतु, या दोन्ही गटात दिलजमाई झाल्यानंतर एका गटाला आठ, तर दुसऱ्या कॉँग्रेसच्या गटाला पाच अशा १३ जागांचे वाटप करण्यात आले. कॉँग्रेसच्या एकीमुळे विरोधी गटाला काही प्रमाणात संधी हुकल्याची चर्चा सुरू आहे.
मात्र, ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत कॉँग्रेसअंतर्गत बंडाळी व जिरवा-जिरवीच्या प्रकाराने कॉँग्रेसला मोठी हार पत्कारावी लागली होती. तीच परिस्थिती संस्थेच्या निवडणुकीत राहल्यास त्याचा भाजपला फायदा होण्याचे संकेत आहेत. कॉँग्रेसच्या तानाजी सूर्यवंशी यांनी बंडखोरी केली आहे, तर दुसऱ्या बाजूला भाजपत १३ उमेदवारी अर्जच असल्याने त्यांच्यात एकी झाल्याचे दिसून येत आहे.
भाजपकडे स्थानिक पातळीवर दिग्गज नेतृत्व नसल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे यश अगदी उंबरठ्यावर आले तरी मिळत नसल्याचा प्रकार अनेकदा घडला आहे.
कॉँग्रेसप्रणित डॉ. पतंगराव कदम पॅनेल या नावाने लढत दिली जात असून, या पॅनेलची धुरा जि. प. सदस्य सुरेश मोहिते, पं. स.सदस्य सखाराम सूर्यवंशी, दिलीप सूर्यवंशी, महादेव दार्इंगडे, शशिकांत माळी, सरपंच मनीषा कांबळे यांच्यावर असून, भाजपप्रणित जयभवानी पॅनेलचे नेतृत्व क्रांती साखर कारखान्याचे संचालक दाजीराम मोहिते, रामचंद्र देशमुख, रमेश एडके, बाळासाहेब वत्रे, अमोल मोहिते, उपसरपंच राहुल होनमाने, रवींद्र कांबळे करीत आहेत. बाजार समिती सदस्य पांडुरंग पोळ, भगवानराव वाघमोडे, धनाजी सूर्यवंशी, काशिनाथ तांदळे यांची भूमिका निर्णायक ठरणार आहे.


दोन गटांत मनोमीलन ?
या संस्थेच्या मागील निवडणुकीत कॉँग्रेसने एकसंधपणे निवडणूक लढविली होती. तरीही कॉँग्रेसचे १७ पैकी १३ उमेदवार केवळ अल्पशा मतांनी विजयी झाले होते. आता तर कॉँग्रेसचे दोन गट एकत्रित करून निवडणुकीला सामोरे जात असले तरी, हे दोन्ही कॉँग्रेसचे गट मनाने एकत्रित झाले आहेत का? असा प्रश्न मतदारांतून होत आहे.

Web Title: For the Vitthaldev Society, fight for the thorns

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.