शिरगावचे विठ्ठल-रुक्मिणी मंदिर सर्वांसाठी खुले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 27, 2017 00:53 IST2017-11-27T00:52:41+5:302017-11-27T00:53:17+5:30

The Vitthal-Rukmini temple of Shirgaon is open to all | शिरगावचे विठ्ठल-रुक्मिणी मंदिर सर्वांसाठी खुले

शिरगावचे विठ्ठल-रुक्मिणी मंदिर सर्वांसाठी खुले


कडेगाव : शिरगाव (ता. कडेगाव) येथील विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात भजन करण्यासाठी आलेल्या देवानंद दगडू कांबळे (रा. वांगी, ता. कडेगाव) यांना मागासवर्गीय असल्याने प्रवेश नाकारण्यात आल्याच्या प्रकारानंतर संतप्त प्रतिक्रिया उमटल्या होत्या. याची गांभीर्याने दखल घेत येथील विठ्ठल-रुक्मिणी मंदिर सर्वांसाठी खुले करण्यात आले. देवानंद कांबळे व दलित बांधवांना घेऊन ग्रामस्थ व रिपाइं कार्यकर्त्यांनी मंदिरात प्रवेश केला. मंदिर मालकाचे पुत्र कृष्णा पारखी यांनी सर्वांचे स्वागत केले.
शिरगाव येथील ग्रामस्थांच्या मध्यस्थीने खासगी मंदिराचे मालक सदाशिव पारखी यांचे सुपुत्र कृष्णा पारखी यांनी हे मंदिर सर्व जाती-धर्माच्या बांधवांसाठी खुले करण्याचा निर्णय घेतला. मंदिर प्रवेशानंतर ग्रामस्थ, रिपाइं कार्यकर्ते व कृष्णा पारखी यांच्या उपस्थितीत बैठक झाली. या बैठकीत, यापुढे असे प्रकार येथे घडणार नाहीत, अशी ग्वाही कृष्णा पारखी यांच्यासह सरपंच व उपसरपंचांनी दिली.
यावेळी रिपाइंचे तालुकाध्यक्ष महादेव होवाळ, जिल्हा उपाध्यक्ष जीवन करकटे, पलूस तालुकाध्यक्ष राजेश तिरमारे, बोधिसत्व माने, रुपेश तिरमारे, संकेत कांबळे, नारायण खरात, अमोल होलमुखे, मिलिंद वाघमारे, मुस्लिम आघाडी अध्यक्ष दस्तगीर फकीर आदी उपस्थित होते.

Web Title: The Vitthal-Rukmini temple of Shirgaon is open to all

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.