तणनाशक फवारून द्राक्षबागेचे नुकसान
By Admin | Updated: December 14, 2014 23:52 IST2014-12-14T22:58:07+5:302014-12-14T23:52:29+5:30
१४ लाखांचा फटका : एकावर गुन्हा

तणनाशक फवारून द्राक्षबागेचे नुकसान
तासगाव : मतकुणकी (ता. तासगाव) येथे द्राक्षबागेवर तणनाशक फवारून सुमारे १४ लाख रुपयांचे नुकसान केल्याप्रकरणी एका संशयितावर गुन्हा दाखल करण्यात आला. द्राक्ष बागायतदार सुरेश ज्ञानू मोरे यांनी याबाबत आज तासगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. याप्रकरणी उल्हास पांडुरंग सदाकळे (रा. मतकुणकी) या संशयितावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दि. ५ नोव्हेंबर रोजी सकाळी ९च्या पूर्वी ही घटना घडली होती.
मतकुणकीतील गट नं. ३३२ ही चार एकर जमीन फिर्यादी सुरेश व त्यांचा भाऊ पांडुरंग मोरे यांच्या नावावर आहे. सुरेश मोरे हेच ही जमीन कसतात. त्यात सुमारे दीड एकर द्राक्षाची बाग आहे. दि. ५ नोव्हेंबर रोजी द्राक्षबागेची पाने वाळू लागल्यानंतर, बागेवर तणनाशक फवारण्यात आल्याचे लक्षात आले. सुरेश मोरे यांनी याबाबत शेजारील शेतकऱ्यांकडे विचारपूस केली होती.
काही दिवसांनी सुरेश व त्यांचा भाऊ पांडुरंग मोरे यांनी शेताच्या आजूबाजूस पाहणी केली, तेव्हा बांधाकडेला ‘मीरा ७१’ या तणनाशकाच्या दोन रिकाम्या पुड्या पडलेल्या आढळल्या. तेथून जवळच मणेराजुरी येथील एका औषध विक्री केंद्राचे नाव असलेली रिकामी पिशवीही सापडली. त्यामुळे संबंधित दुकानात जाऊन मोरे यांनी हे औषध कुणी खरेदी केले होते, याची विचारपूस केल्यानंतर, दि. ४ रोजी संशयित उल्हास सदाकळे याने हे औषध खरेदी केल्याचे समजले, असे दिलेल्या फिर्यादीत नमूद आहे. त्यामुळे द्राक्षबागेवर जाणूनबुजून तणनाशक फवारले असल्याची फिर्याद देण्यात आली आहे. (वार्ताहर)