विटा स्थानकातील पोलीसच गायब !
By Admin | Updated: August 27, 2014 23:13 IST2014-08-27T23:10:23+5:302014-08-27T23:13:53+5:30
तरुणांची हुल्लडबाजी : ज्येष्ठ नागरिकांसह युवतींचेही हाल

विटा स्थानकातील पोलीसच गायब !
विटा : कऱ्हाड-विजापूर राज्यमार्गावरील सर्वात मोठ्या व मध्यवर्ती असणाऱ्या राज्य परिवहन महामंडळाच्या विटा बसस्थानकात सध्या बंदोबस्तासाठी असलेले पोलीस गायब झाल्याचे दिसून येत आहे. शाळा-महाविद्यालये सुटल्यानंतर विटा बसस्थानकात प्रचंड गर्दी होत असल्याने महाविद्यालयीन युवकांची हुल्लडबाजी पहावयास मिळत आहे. या प्रकाराने ज्येष्ठ नागरिक प्रवाशांसह युवतींचे हाल होत असून प्रवाशांची सुरक्षितता धोक्यात आली आहे.
विटा बसस्थानक कऱ्हाड ते विजापूर महामार्गावरील मध्यवर्ती मोठे बसस्थानक आहे. त्यामुळे प्रवाशांची नेहमीच गर्दी होत असते. सध्या शाळा-महाविद्यालयीन विद्यार्थ्यांमुळे गर्दीत मोठी वाढ झाली आहे. गर्दीचा गैरफायदा घेऊन चोरट्यांनाही चोरीचा हेतू साध्य करण्याची संधी मिळत आहे. विटा बसस्थानकात फलाटाला बस लावल्यानंतर होणाऱ्या गर्दीत चोरट्यांनी अनेक महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने लंपास केल्याच्या घटनाही अनेकदा घडल्या आहेत.
विटा शहरातील शाळा-महाविद्यालये सुटल्यानंतर सायंकाळी ५ वाजल्यापासून बसस्थानकात विद्यार्थी व प्रवाशांची मोठी गर्दी होत आहे. एसटी फलाटावर आल्यानंतर विद्यार्थी बसमध्ये जागा धरण्यासाठी खिडकीतून आपले दफ्तर आत टाकतात. संकटकालीन दरवाजा किंवा चालकाच्या दरवाजातूनही बसमध्ये प्रवेश करण्याचे प्रकार सुरू आहेत. तसेच बसच्या दरवाजाजवळ तुडुंब गर्दी करून महिला व कॉलेज युवतींना बाजूला ढकलून बसमध्ये घुसण्याचा प्रकारही युवकांकडून सुरू आहे. त्यामुळे ज्येष्ठ नागरिक व प्रवाशांसह विद्यार्थिनींचेही मोठे हाल सुरू आहेत.
या गर्दीला आवर घालणे किंवा प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी विटा पोलीस ठाण्यातून नेमणुकीस असलेले पोलीस कर्मचारी बसस्थानक परिसरातून गायब झाल्याचे अनेकदा पाहावयास मिळत आहे. त्यामुळे बंदोबस्तास पोलीस नसल्याने युवकांचेही चांगलेच फावले आहे. परिणामी, हुल्लडबाजी व गर्दीमुळे चोरट्यांनाही हुल्लडबाज तरुणांचा हा प्रकार पर्वणीच झाला आहे.
दरम्यान, विटा बसस्थानकातील प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी बसस्थानकात कर्तव्यदक्ष पोलिसांची नेमणूक करावी, तसेच हुल्लडबाजी करणाऱ्या युवकांवरही कायदेशीर कारवाईचा बडगा उगारून ज्येष्ठ नागरिक, प्रवाशांसह महाविद्यालयीन विद्यार्थिनींचीही सुरक्षितता अबाधित राखावी, अशी मागणी होत आहे. (वार्ताहर)