विश्वजित कदम यांची घाटमाथ्यावरील फौज वाळव्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 18, 2021 04:19 IST2021-06-18T04:19:01+5:302021-06-18T04:19:01+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क इस्लामपूर : काँग्रेसचे दिवंगत ज्येष्ठ मंत्री पतंगराव कदम यांच्या गटाची पलूस-कडेगाव तालुक्यांसह कऱ्हाड आणि वाळवा तालुक्यांत ...

विश्वजित कदम यांची घाटमाथ्यावरील फौज वाळव्यात
लोकमत न्यूज नेटवर्क
इस्लामपूर : काँग्रेसचे दिवंगत ज्येष्ठ मंत्री पतंगराव कदम यांच्या गटाची पलूस-कडेगाव तालुक्यांसह कऱ्हाड आणि वाळवा तालुक्यांत मोठी ताकद आहे. कडेगाव तालुक्याची घाटमाथ्यावरील भाग अशी ओळख आहे. कदम यांचे पुत्र कृषी राज्यमंत्री डॉ. विश्वजित कदम यांची फौज कृष्णेच्या निवडणुकीत वाळवा तालुक्यात रयत पॅनलच्या बाजूने कार्यरत झाली आहे.
माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि विश्वजित कदम यांनी रयत पॅनल व संस्थापक पॅनलचे मनोमिलन करण्याचा प्रयत्न फोल ठरला. कदम घराण्याशी डॉ. इंद्रजित मोहिते यांचा जिव्हाळा असल्याने कदम यांनी रयत पॅनलला थेट पाठिंबा दिला आहे. कदम आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी रयत पॅनलच्या उमेदवारांसाठी सभासदांच्या बैठकाही सुरू केल्या आहेत. त्यामुळे रयत पॅनलला बळ मिळाले आहे.
नेर्ले-तांबवे गटात नेर्ले येथे राष्ट्रवादी आणि महाडिक गटाचे वर्चस्व आहे. त्यामुळे सहकार पॅनलने जलसंपदामंत्री जयंत पाटील यांचे नातेवाईक संभाजी पाटील यांना उमेदवारी दिली आहे, तर रयतने संभाजी पाटील यांचे चुलत बंधू माजी सरपंच प्रशांत पाटील यांना उमेदवारी देऊन आव्हान उभे केले आहे. याच गटात विद्यमान संचालक लिंबाजी पाटील (तांबवे) यांना सहकारने उमेदवारी दिली आहे, तर रयत पॅनलने विश्वजित कदम यांचे कार्यकर्ते गणेश पाटील यांना उमेदवारी देऊन ताकद वाढवण्याचा डाव खेळला आहे.
बोरगावमध्ये डॉ. इंद्रजित मोहिते यांनी इस्लामपूरचे माजी नगराध्यक्ष आनंदराव मलगुंडे आणि कामेरीत येथील प्रा. अनिल पाटील, तर रेठरेहरणाक्ष येथे दिलीप मोरे यांना उमेदवारी दिली आहे. बहे येथे सहकारपुढे आव्हान उभे करण्यासाठी ‘कृष्णे’चे माजी उपाध्यक्ष राजेसाहेब थोरात यांच्या स्नुषा सत्त्वशीला थोरात यांना रयतने उमेदवारी दिली आहे. सोबतच, शिरटे येथील माजी संचालक आणि स्टार प्रचारक पैलवान हणंमतराव पाटील यांच्या स्नुषा सुरेखा पाटील यांना रिंगणात उतरवून कडवे आव्हान उभे केले आहे.
येडेमच्छिंद्र-वांगी गटात रयतला कदम घराण्याची ताकद मिळणार आहे. येडेमच्छिंद्र हे पतंगराव कदम यांचे आजोळ आहे. या गटात त्यांच्या कार्यकर्त्यांचा संपर्क आहे. येडेमच्छिंद्र येथे राष्ट्रवादीचे कार्यकर्ते संजय पाटील यांना उमेदवारी देऊन रयतने खेळी खेळली आहे.
घाटमाथ्यावर तिन्ही पॅनलने देवराष्ट्रे गावातच उमेदवारी दिली आहे. सहकार पॅनलने बाबासाहेब शिंदे यांना उतरवले आहे. त्यांच्याविरोधात पतंगराव कदम यांच्या घराण्याशी एकनिष्ठ असलेले बाबासाहेब मोरे यांना उमेदवारी देऊन कदम घराणे ताकद आजमावणार आहेत. संस्थापक पॅनलने भाजपचे माणिक मोरे यांना उमेदवारी दिली आहे. सांगली जिल्ह्यात सहकार पॅनलमागे राष्ट्रवादीची फौज असली, तरी रयत पॅनलला आता डॉ. विश्वजित कदम यांनी बळ देऊन प्रचाराचा धूमधडाका सुरू केला आहे.
चौकट
समतोल राखण्याचा प्रयत्न
घाटमाथ्यावरील गावांमध्ये कृष्णेचे ३६०० सभासद आहेत. ते कॉँग्रेस, राष्ट्रवादी आणि भाजपमध्ये विखुरले आहेत. त्यामुळे तिन्ही पॅनलने उमेदवारी देताना समतोल राखण्याचा प्रयत्न केला आहे.
चौकट
वैयक्तिक कार्यपद्धतीवर कार्यकर्ते पाठीशी
घाटमाथ्यासह काही गावांमध्ये संस्थापक पॅनलचे प्रमुख अविनाश मोहिते यांनी वैयक्तिक कार्यपद्धतीवर कार्यकर्ते मिळवले आहेत. मोहिते सभासदांच्या सुख-दुु:खाच्या कार्यक्रमात उपस्थिती दाखवतात.