श्रीनिवास नागे
सांगली : काँग्रेसचं बहुचर्चित आणि बहुप्रतीक्षित जिल्हाध्यक्षपद अखेर कदम गटाच्याच ताब्यात राहिलं. विशाल पाटील यांना जिल्हाध्यक्ष पदाऐवजी प्रदेश उपाध्यक्षपद दिल्यानं वसंतदादा गटात अस्वस्थता निर्माण झाली. अन्याय झाल्याची भावना उफाळून आली आणि सोशल मीडियावर दबकत का होईना निषेधाच्या पोस्ट पडल्या. आधीच लोकसभा की विधानसभा या द्विधावस्थेत असणारे विशाल पाटील आता नव्यानं संभ्रमात पडलेत. त्यामुळंच त्यांनी निवडीबाबत हाताची घडी घालून तोंडावर बोट ठेवलंय. काँग्रेसचं एक मात्र भारी असतंय. जिल्ह्यातल्या वादावर थेट दिल्लीचा उतारा दिला जातो. गुरुवारी रात्री दिल्लीतून जम्बो कार्यकारिणीची यादी आली. जिल्हाध्यक्षपदी जतचे आमदार विक्रम सावंत यांची वर्णी लागली. विशाल पाटील यांचं नाव १८ प्रदेश उपाध्यक्षांच्या यादीत दिसलं. तरी बरं ! सचिवपद दिलं असतं तर १०४ जणांच्या यादीत ते शोधावं लागलं असतं. एकेकाळी राज्याची यादी वसंतदादा ठरवत. मात्र उपाध्यक्षपदाची जबाबदारी देताना (की नाराजी काढताना?) दादांच्या नातवाची संमती घेण्याचं सौजन्यही पक्षश्रेष्ठींनी दाखवलं नाही. विशाल यांना विचारलं असतं तरी संमती मिळाली नसती, हा भाग अलाहिदा!
गेली कित्येक वर्षे दिवंगत नेते पतंगराव कदम यांचे मोठे बंधू मोहनराव जिल्हाध्यक्ष आहेत. आता वयोमानामुळं त्यांना थांबवून नवा चेहरा देण्याचं घाटत होतं. या पदावर विशाल पाटील यांचा दावा असताना कृषी राज्यमंत्री विश्वजित कदम यांचे मावसबंधू तथा जतचे आमदार विक्रम सावंत यांचं नाव पुढं आलं. अर्थात तेव्हाच त्यावर शिक्कामोर्तब झालं होतं.
विश्वजित कदम ‘हायकमांड’च्या ‘गुड बुक्स’मध्ये आहेत. त्यांनी स्वत:सह सावंत यांना निवडून आणलंय. पक्षकार्यासाठी लागणारी ‘रसद’ तेच पुरवताहेत. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष तथा पालकमंत्री जयंत पाटील यांच्या साम्राज्यवादाला टक्कर देण्याची (प्रसंगी जुळवून घेण्याचीही!) क्षमता त्यांच्याच गटात आहे. जयंतरावांनी जतमध्ये सावंत यांच्याविरोधात तगडी फौज उभी करण्यास सुरुवात केलीय. सावंत यांच्या संकल्पनेतून आलेल्या ‘तुबची-बबलेश्वर’ऐवजी म्हैसाळच्या विस्तारित योजनेला मान्यता दिलीय. त्यामुळं आता सावंत यांना जिल्हाध्यक्षपदाची ताकद दिली पाहिजे, हा युक्तिवाद कदम गटाचं बलस्थान ठरला.
चौकट
ते मागं का पडले?
पक्ष संघटनेसाठी विशाल पाटील फारसे कार्यरत नसतात. लोकसभेला ते दुसऱ्या पक्षातून लढले. ती राजकीय अपरिहार्यता असली तरी ते पक्षाबाहेर गेले होते. हा ठपका पुसून काढत आधी त्यांनी पक्षात येऊन काम केलं पाहिजे. त्यांच्यासाठी विश्वजित कदम यांना कशासाठी अस्वस्थ करायचं, या मुद्द्यांवर ते मागं पडले असावेत.
‘एबी’ फॉर्मवर सही जिल्हाध्यक्षाचीच
राज्याच्या कार्यकारिणीवर जाण्यात स्वारस्य नाही. त्याऐवजी जिल्हाध्यक्षपदच द्या, असा विशाल पाटील यांचा आग्रह होता. मोहनशेठ यांना बदलणार असाल तर ते पद आम्हालाच द्या, अन्यथा नको, हा त्यांचा हेका होता. पक्षीय पातळीवर लढवल्या जाणाऱ्या जिल्ह्यातल्या सगळ्या निवडणुकांत पक्षाच्या ‘एबी’ फॉर्मवर जिल्हाध्यक्षाची सही असते. प्रदेश उपाध्यक्षाला कोणी हिंगलत नाही. मग आता हे पद स्वीकारायचं की नाही, या धर्मसंकटात ते सापडलेत.
चौकट
पुढच्या घडामोडी उत्सुकता वाढवणाऱ्या
जिल्हाध्यक्षपद मिळणार नसल्याची कुणकुण वसंतदादा गटाला आधीच लागली होती. पण निवडी परस्पर जाहीर होतील, असं वाटलं नव्हतं. सर्व गटतटांना एकत्र बोलावलं जाईल, भविष्यातल्या संधींची ग्वाही मिळेल, असा होरा बांधल्यानं हिरमोड झाला. त्यामुळं कार्यकर्त्यांचा रेटा आणि मनाचा काैल, यावर विशाल पाटील पुढची वाटचाल ठरवतील. राज्य उपाध्यक्षपद किती फायद्याचं, हे ‘पटवून’ दिल्यावर दादा गट कामाला लागेल!