चांदोली धरणातून विसर्ग वाढवला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2021 04:31 IST2021-09-14T04:31:03+5:302021-09-14T04:31:03+5:30
वारणावती : चांदोली धरण परिसरात जोरदार पाऊस सुरू आहे. पाणलोट क्षेत्रातून पाण्याची आवक मोठ्याप्रमाणात होत आहे. धरणातील पाणीसाठा नियंत्रित ...

चांदोली धरणातून विसर्ग वाढवला
वारणावती : चांदोली धरण परिसरात जोरदार पाऊस सुरू आहे. पाणलोट क्षेत्रातून पाण्याची आवक मोठ्याप्रमाणात होत आहे. धरणातील पाणीसाठा नियंत्रित ठेवण्यासाठी धरणाचे चारही दरवाजे खुले केले असून, धरणाच्या सांडव्यातून ६८२८ व पावर हाऊसमधून १३७७ असा एकूण ८२०५ क्युसेक विसर्ग सध्या वारणा नदी पात्रात सुरू आहे. त्यामुळे वारणा पात्राबाहेर पडली आहे.
शिराळा तालुक्यातील चांदोली धरण परिसरात जोरदार पाऊस कोसळत आहे. पाणलोट क्षेत्रात कधी मुसळधार, तर कधी संततधार पाऊस सुरूच आहे. रविवारी रात्री आठ ते सोमवार सकाळी आठपर्यंत ३७ मिलिमीटरसह एकूण २८१२ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. धरणातील पाणीसाठा ३४.३६ टीएमसी एवढा नियंत्रित ठेवला आहे. त्याची टक्केवारी ९९.८६ अशी आहे.
धरणाच्या पाणलोट क्षेत्रातून जवळपास सहा हजार क्युसेक पाण्याची आवक होत आहे. त्यामुळे रविवारपासून ५४८२ क्युसेक विसर्ग सुरू होता; पण पाण्याची आवक वाढल्याने सोमवारी सकाळी दहा वाजल्यापासून ८२०५ क्युसेक विसर्ग वारणा नदीत सुरू केला आहे. त्यामुळे वारणा नदी पात्राबाहेर पडली आहे. नदीकाठावरील पिके पुन्हा पाण्याखाली गेली आहेत. कोकरूड-रेठरे बंधारा पाण्याखाली गेला आहे. आरळा- शित्तूर पुलावर पाणी येण्यासाठी दोन फूट कमी अंतर आहे. पावसाचे प्रमाण वाढल्यास धरणातील विसर्ग केव्हाही वाढवला जावू शकतो. आरळा-शित्तूर, चरण-सोंडोली, बिळाशी-भेडसगाव हे पुल पाण्याखाली जाऊन वाहतूक बंद होऊ शकते. त्यामुळे नदीकाठाच्या गावांनी सतर्कता बाळगावी, असे आवाहन धरण प्रशासनाने केले आहे.