बेळुंखी येथे द्राक्षबागेला आग

By Admin | Updated: December 29, 2014 23:47 IST2014-12-29T23:16:30+5:302014-12-29T23:47:08+5:30

दहा लाखांचे नुकसान : शॉर्टसर्किटमुळे दुर्घटना; वीज जनित्रामधून ठिणग्या

Vineyard fire | बेळुंखी येथे द्राक्षबागेला आग

बेळुंखी येथे द्राक्षबागेला आग

जत : तालुक्यातील बेळुंखी येथील वीज जनित्रामध्ये शॉर्टसर्किट होऊन लागलेल्या आगीत सीताराम यशवंत चंदनशिवे यांची एक एकर द्राक्षबाग व त्यातील साहित्य जळून भस्मसात झाले. या आगीत सुमारे दहा लाखांचे नुकसान झाले आहे. ही घटना शनिवारी दुपारी दोनच्या दरम्यान घडली.
बेळुंखी ते वाशाण रस्त्यावर बेळुंखीपासून सुमारे तीन किलोमीटरवर चंदनशिवे यांची शेतजमीन आहे. कर्ज काढून आणि हातउसने पैसे घेऊन त्यांनी माळरानावर एक एकर द्राक्षबाग तयार केली होती. बागेच्या एका बाजूला विद्युत जनित्र आहे. शनिवारी दुपारी या जनित्रातील तारेमध्ये तांत्रिक दोष निर्माण होऊन ठिणग्या पडू लागल्या. त्या ठिणग्या जमिनीवरील गवतावर पडून गवताने पेट घेतला व तशीच आग पुढे द्राक्षबागेत पसरली. वाऱ्यामुळे क्षणार्धात संपूर्ण बाग जळून भस्मसात झाली. बागेला लागूनच चंदनशिवे यांचे घर आणि जनावरांचा गोठा आहे. आग लागताच घरातील सर्वजण बाहेर पळत आले. शेजाऱ्यांच्या मदतीने त्यांनी घराजवळ येत असलेली आग आटोक्यात आणली. मात्र, वाऱ्यामुळे आग भडकत असल्यामुळे बागेला लागलेली आग विझविता आली नाही.
या आगीमध्ये एक एकर द्राक्षबाग, दोन हजार कडब्याची गंजी, एचटीपी पाईप, ठिबक संच, द्राक्षबागेतील पीव्हीसी पाईप व सबमर्सिबल पंपासाठी जोडलेली पाईप, आदी सुमारे दहा लाख रुपयांचे साहित्य जळून भस्मसात झाले आहे. याप्रकरणी तहसीलदार डी. एम. कांबळे यांनी घटनास्थळास भेट देऊन पाहणी केली व डफळापूर (ता. जत) मंडल अधिकारी ताजुद्दीन मुल्ला यांना पंचनामा करून तत्काळ अहवाल सादर करण्याचे आदेश दिले. वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळास भेट देऊन अहवाल सादर केला आहे. या दुर्घटनेमुळे हळहळ व्यक्त होत आहे. (वार्ताहर)

Web Title: Vineyard fire

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.