खानापूर गटातील गावे लेंगरेला जोडली
By Admin | Updated: September 10, 2016 00:40 IST2016-09-09T23:14:01+5:302016-09-10T00:40:18+5:30
जिल्हा परिषदेचे तीन गट : पंचायत समितीचे सहा गण, प्रारूप रचना, १० आॅक्टोबरला अंतिम घोषणा

खानापूर गटातील गावे लेंगरेला जोडली
विटा : खानापूर तालुक्याची जिल्हा परिषद गट व पंचायत समिती गणांची प्रारूप रचना तयार करण्यात आली असून हरकती व सूचनांची मुदत संपल्यानंतर दि. १० आॅक्टोबरला अंतिम रचना जाहीर होणार आहे. तालुक्यात यावेळी एक जिल्हा परिषद गट रद्द करण्यात आला असल्याने पंचायत समितीसाठी सहा गण राहणार आहेत. प्रत्येक जिल्हा परिषद गटात २०११ च्या जनगणनेनुसार ३८ हजार ५०० पर्यंतची लोकसंख्या निश्चित करण्यात आली आहे. खानापूर शहर नगरपंचायत जाहीर झाल्याने त्या गटातील गावे लेंगरे जिल्हा परिषद गटाला जोडण्यात आली आहेत.
खानापूर तालुक्यात यापूर्वी चार जिल्हा परिषद गट व आठ पंचायत समितीचे गण होते. खानापूर नगरपंचायत झाल्याने हे गाव त्यातून वगळण्यात आले आहे. त्यामुळे खानापूर पूर्व भागातील करंजे व बाणूरगडपर्यंतची गावे लेंगरे जिल्हा परिषद गटाला जोडण्यात आली आहेत.
नागेवाडी, लेंगरे व भाळवणी हे तीन जिल्हा परिषद गट आणि गार्डी, नागेवाडी, लेंगरे, करंजे व भाळवणी, पारे हे सहा पंचायत समिती गण तयार करण्यात आले आहेत. नागेवाडी जिल्हा परिषद गटात ३८ हजार ७५९, लेंगरे जिल्हा परिषद गटात ३८ हजार १६५ व भाळवणी जिल्हा परिषद गटात ३८ हजार ५४४ लोकसंख्या समाविष्ट करण्यात आली आहे.
गार्डी पंचायत समिती गणात ११, नागेवाडी पंचायत समिती गणात ९, लेंगरे पंचायत समिती गणात १२, करंजे पंचायत समिती गणात १४, भाळवणी पंचायत समिती गणात ८ व पारे पंचायत समिती गणात १० गावांचा समावेश करण्यात आला आहे. नवीन प्रारूप गट व गणांच्या रचनेनुसार अनेक गावांनी जुना गट व गण सोडून सोयीनुसार नव्या गटात प्रवेश केला आहे. त्यामुळे यावेळी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी राजकीय कार्यकर्त्यांमध्ये ‘कही खुशी, कही गम’ असे वातावरण दिसून येत आहे.
दरम्यान, विटा तहसील प्रशासनाच्या निवडणूक शाखेने खानापूर तालुक्यातील जिल्हा परिषद गट व पंचायत समिती गणासाठी नवीन प्रारूप रचना तयार करून जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठविली आहे. ही नवीन संभाव्य प्रारूप रचना आयुक्त कार्यालयाकडे पाठविल्यानंतर त्यावर हरकती व सूचना मागविण्यात येणार आहेत. त्यानंतरच दि. १० आॅक्टोबरला ही नवीन प्रारूप रचना अंतिमरित्या जाहीर होणार असल्याचे प्रशासनाच्यावतीने सांगण्यात आले. (वार्ताहर)